येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा
By राजू इनामदार | Published: October 11, 2024 05:08 PM2024-10-11T17:08:56+5:302024-10-11T17:09:15+5:30
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात, हा राजकारणातला गोंधळ आम्ही दुर करणार
पुणे : राजकारणाची सध्याच्या नेत्यांनी बजबजपुरी केली आहे. कोण कुठे होता आणि कुठे असेल, काहीच सांगता येत नाही. राजकारणातील हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे. येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू, असा निर्धार छत्रपती संभाजी राजे यांनी कार्यकर्त्यांबरोबर व्यक्त केला.
स्वराज्य पक्ष स्थापनेची घोषणा संभाजी राजे यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी दुपारी १२ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला राज्य सरचिटणीस धनंजय जाधव यांच्यासह राज्यातील विविध शहरांमधून पदाधिकारी उपस्थित होते. भगव्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृह भरले होते. मिरवणुकीने आलेल्या संभाजी राजे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
प्रस्थापित राजकारण्यांवर टीका करताना संभाजी राजे यांनी शरद पवार यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कोणालाही सोडले नाही. शरद पवार देशाचे नेते होते. परदेशी हातांखाली काम करणार नाही म्हणत काँग्रेसपासून बाजूला झाले, पुन्हा त्यांच्याबरोबर गेले. अजित पवार उठता-बसता शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतात आणि भाजपबरोबर जातात. भाजपतील मोदींसह सगळे अजित पवारांवर सर्वात मोठा भ्रष्टाचारी म्हणून टीका करतात व त्यांनाच बरोबर घेतात. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात. हा सगळा गोंधळ हे लोक जनतेला गृहित धरून करतात. त्यामुळेच त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे संभाजी राजे म्हणाले.
स्वराज्य पक्ष या सर्वांना उत्तर देण्यासाठी आणि हा गोंधळ संपवण्यासाठी आहे, असे स्पष्ट करून संभाजी राजे म्हणाले, ‘आम्हाला ते हलक्यात घेतात, चेष्टा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची अशीच चेष्टा झाली, पण अंती तेच जिंकले. महात्मा गांधी यांनीही तेच सांगितले की, सुरुवातीला ते तुम्हाला दुर्लक्षित करतील, हसतील, नंतर लढतील व त्या लढतीत तुमचाच जय होईल. आमचे ध्येय तेच आहे. राज्यातील एकातरी विरोधी पक्षाने थेट पंतप्रधानांना, तुम्ही ज्याचे उद्घाटन केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? हे विचारण्याचे धाडस केले का? आम्ही ते केले. आता समविचारींना बरोबर घेऊन परिवर्तन महाशक्ती तयार करून विधानसभा जिंकणार, असा निर्धार संभाजी राजे यांनी व्यक्त केला.