इंदापूर : मागील लोकसभा निवडणुकीत अमेठी जिंकली. आगामी निवडणुकीत बारामती जिंकायची आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ती जिंकूनच दाखवू, असा दावा विधान परिषदेतील आमदार बारामती लोकसभा प्रभारी प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी (दि. ३) भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दि. ६ सप्टेंबरच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी इंदापूर अर्बन बँकेच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली होती. माजी मंत्री, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले की, तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकीस अवधी असला तरी भाजपने त्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अमेठी जिंकली. येणाऱ्या निवडणुकीत बारामती जिंकायचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठी येत्या ६ सप्टेंबरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येणार आहेत. त्यानंतर दि. २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.
अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणारा भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर यशस्वी वाटचाल करत आहे. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत आहे. या डबल इंजिन सरकारचा इंदापूरच्या विकासासाठी जास्तीत जास्त फायदा घेण्याबाबत नियोजन करण्यात येईल.
हर घर जल पेयजल ही केंद्र शासनाची योजना आहे. तिचा ५५ ते ६० टक्के निधी केंद्र सरकारचा असतो. ४० ते ४५ टक्के निधी राज्य सरकारचा असतो. केंद्र व राज्यात भाजपचेच सरकार आहे, त्यामुळे या योजनेचे सर्व श्रेय भाजपाला जाते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही, असे या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.