कल्याणराव आवताडे -पुणे : कोरोनाशी लढा देत देशभरातले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, इतर आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. पुण्यातील नायडू रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे जोखीम पत्करून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. ह्या लढ्यात आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास 'नायडू'तील तरुण डॉक्टर अमर अंकुशराव, क्षितिज देशमुख व लोकेश कृष्णा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी सामोरे गेले आहेत. सर्वात आधी ह्या मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसेच आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढत आहेत. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौयार्चे काम करणारे नायडू रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे अमर अंकुशराव, क्षितिज देशमुख व लोकेश कृष्णा ह्या तिघा तरुण वैद्यकीय अधिकाऱ्यांशी 'लोकमत'ने संवाद साधला असता रात्रपाळीत काम करणारे डॉक्टर अंकुशराव म्हणाले कि, कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णांची तपासणी करणे, तसेच परदेशवारी करून आलेल्या व्यक्तीची अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी आम्ही करीत आहोत.
सध्या 'नायडू' मध्ये २४ तास ओपीडी सुरु असून आम्हा सर्व डॉक्टरांना पीपीई किट देण्यात आले आहे. क्षितिज देशमुख म्हणाले कि, सध्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर संशयित रुग्णांची सोय करण्यात आली असून तिसऱ्या मजल्यावर कोरोनाबाधित रुग्णांची सोय करण्यात आली आहे. वार्डची क्षमता १० रुग्णांची असतानाही दोन रुग्णांमध्ये अंतर राहावे यासाठी खबरदारी म्हणून एका वार्डमध्ये ६ रुग्णच ठेवण्यात आले आहेत.कामाच्या ठिकाणी सर्व प्रकारची खबरदारी घेत असून आम्ही घरी गेल्यानंतरही कुटुंबापासून वेगळे राहत आहे. काही संशयित रुग्ण हे नॉर्मल असून त्यांना कोणताही त्रास होत नसला तरी त्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असल्याने आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर लोकेश कृष्णा यांनी व्यक्त केले. आम्ही अशाप्रकारची जोखीम पत्करणारी नोकरी सोडून द्यावी,अशी भावना आमच्या कुटुंबियांच्या मनात आली. मात्र, रुग्णांची सेवा करणे हे कर्तव्य असल्याने ते काम अर्धवट सोडता येणार नसल्याचे सांगत त्यांना समजावून सांगितल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांना बरे करायचे असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करून इतर नागरिकांना ह्याची लागण होऊ नये ह्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेत. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यापुढेही लढा देऊन कोरोनाविरुद्धचा लढा आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केला. .....................
अफवांवर विश्वास ठेवू नका; विनाकारण घराबाहेर पडू नका.. कोरोनाच्या महाराष्ट्रातील आणि भारताच्या निरनिराळ्या राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याविषयी लोकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि खासकरून व्हॉटस अॅपवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ती वाचूनही लोकांमध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे करोना व्हायरसपासून आपला बचाव करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका, त्याचबरोबर विनाकारण घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन नायडू रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.