पुणे : सगळा देश दीपावली साजरा करत असतो. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र ऐन सणातही आपापले काम करत असतात. त्यांना मात्र कामाची जागा सोडता येत नाही. सुट्टी घेता येत नाही; कारण त्यांच्या कामाचे स्वरूपच तसे असते.
अत्यावश्यक नागरी सेवांमधील कर्मचाऱ्यांना खरोखरच सणासुदीच्या काळात रजाही घेता येत नाही. दीपावली त्यांना कामावरच साजरी करावी लागते. सार्वजनिक रुग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांवर तर ही वेळ कायम येतेच. अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणतीही वर्दी आली की लगेच तिथे धाव घ्यावी लागते. दिवाळीत तर असे प्रकार घडण्याची जास्त शक्यता असल्याने दिवसा व रात्रीही सज्ज राहावे लागते.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनाही याच काळात जबाबदारीने काम करावे लागते, तेही अनेकदा डबल ड्युटी करून. कारण याच काळात त्यांच्या गाड्यांना मागणी असते, प्रवाशांची गर्दी असते. जनसेवेचे कंकण करी बांधियले अशा भावनेने हे कर्मचारी काम करत असतात. त्यांच्या भावना जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.
नागरिकांच्या रक्षणासाठी काम करण्याचे समाधान
अग्निशमन दलात रुजू झाल्यापासून मागच्या २२ वर्षांत एकदाही मला दिवाळीत सुटी मिळाली नाही. सुरुवातीला याचं खूप वाइट वाटायचं; मात्र, नंतर सवय झाली. नागरिक दिवाळीचा आनंद साजरा करतात, आम्ही त्यांच्या रक्षणासाठी काम करीत असताे, याचे समाधान आणि अभिमानही वाटताे. आज लक्ष्मीपूजन आहे, लाेक उटणं लावून अभ्यंगस्नान करतात. मी मात्र, आज सकाळी सात ते दुपारी दाेन वाजेपर्यंत ड्युटी असल्याने सकाळी पटापट अंघाेळ उरकून अग्निशमन दलाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात हजर झालाे. सर्वप्रथम शहरातील अग्निशमन दलाचे रिपाेर्ट तपशीलात नाेंद केले. त्यानंतर नियंत्रण कक्षात आलेले काॅल घेत गाडी पाठविण्याचे काम केले. - प्रमाेद भुवड, अग्निशमन नियंत्रण कक्ष
सण असूनही दिवसभर ऑन ड्युटी
आज दिवाळी असतानाही माझी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ड्युटी आहे. मुलं घरी आणि आम्ही इथं रस्त्यावर उभं राहून दिवसभर वाहतूक नियमनाचे काम करीत आहे. पाेलिसांना अनेकदा सुटी न मिळाल्याने कुटुंबासाेबत सण साजरा करता येत नाहीत. गावीही जाता येत नाही. कामात जास्त वेळ जात असल्याने या दिवाळीला फराळाचे साहित्यही बनवायला वेळ मिळाला नाही. आता बाहेरून मिठाई घेऊन जात पूजा करणार आहे. - सुवर्णा जगताप, पाेलीस नाईक, डेक्कन वाहतूक विभाग
आधी कामाला प्राधान्य मग सुटी
पाेलीस दलात कामाला पहिलं प्राधान्य द्यावे लागते. यंदा दिवाळीत महत्त्वाचा बंदाेबस्त असल्याने सुटी मिळाली नाही. कुटुंबीयांनाही याची सवय झाली आहे. दिवाळीनिमित्त पहाटे लवकर दिवस सुरू झाला. घरातील सर्व कामे आटाेपून पाेलीस ठाण्यात आले. दिवसभर शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या बेलबाग चाैकात वाहतूक नियमनाचे काम केले. आता दिवसभर काम आणि त्यानंतर सायंकाळी घरी जाऊन लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे. सण-उत्सव काळात नाेकरदार महिलांना घरातील कामे आणि नाेकरीवरील कर्तव्य अशी दुहेरी तारेवरची कसरत करावी लागते. - कविता रूपनर, उपनिरीक्षक, फरासखाना पाेलीस ठाणे