पुणे : ६ महिन्यांत २७० टक्के परतावा देण्याच्या आमिषाला भूलल्याने व्याज तर सोडा, मुद्दलही गमावण्याची पाळी काही जणांवर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी वेल्थ प्लॅनेटच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वेल्थ प्लॅनेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित संजय कुलकर्णी, टीम लिडर प्रज्ञा अभिजित कुलकर्णी, सीएफओ अनिकेत संजय कुलकर्णी, सीओओ श्वेता श्रीधर नातू, ओव्हरसीज सपोर्ट हेड नितीन पाष्टे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी हेमंत बाळकृष्ण गुजराथी (वय ५०, रा. लॉ कॉलेज रोड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेल्थ प्लॅनेटमध्ये ६ महिन्यांसाठी २ कोटी रुपयांची ठेवी स्वरूपात गुंतवणूक करून त्यावर २७० टक्के परतावा मिळून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना २ कोटी रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ही ठेव व त्यावरील परतावा ५ कोटी ६६ लाख रुपये व नुकसान भरपाई ४ कोटी ७५ लाख ४४ हजार रुपये असे १२ कोटी ४१ लाख ४४ हजार रुपये तसेच फिर्यादी यांचे परिचित व्यक्तींचे मूळ ठेव व परतावा रक्कम अशी अंदाजे १९ कोटी ५१ लाख रुपये अशी एकूण ३१ कोटी ९२ लाख ४४ हजार रुपये मूळ ठेव व त्यावरील परतावा परत न करता विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक लंबे अधिक तपास करीत आहेत.