सुरक्षेऐवजी गुन्हा घडण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समाजात असुरक्षितता वाढली आहे. अनेकदा दुकानदार, बांधकाम व्यावसायिक यांच्यावर पैशासाठी दिवसाढवळ्या हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच लोकांकडून स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाना मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देताना कडक तपासणी सुरू केल्याने गेल्या ४ वर्षांत शहरातील शस्त्र परवानांमध्ये घट दिसून आली आहे.
पुणे शहरात अनेक लष्करी आस्थापना आहेत. तेथील अधिकारी तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींकडे शस्त्र परवाना असतो. त्यांना तो द्यावाच लागतो. शहरात सध्या जवळपास १२ हजारांहून अधिक जणांकडे शस्त्र परवाना आहे.
शस्त्र परवान्यांमध्ये झाली घट
शस्त्र परवाना देताना संबंधितांना खरोखरच कोणाकडून धोका आहे का? त्यांना शस्त्राची किती आवश्यकता याची तपासणी पोलीस दलाकडून केली जाते. त्यानंतरच त्यांना शस्त्र परवाना दिला जातो. त्यात असे शस्त्र बाळगण्याची त्यांची ऐपत व गरजही आहे का, याचीही तपासणी होते. ही तपासणी गेल्या ४ वर्षांत अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरात शस्त्रासाठी केलेले अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्याचबरोबर शस्त्र असल्याने नैराश्येतून अनेकांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी बाळगलेल्या शस्त्रामुळेच त्या व्यक्तीचा घात झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत शस्त्र बाळगत असलेल्या काही जणांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. व्यवसाय असल्याने रात्री-अपरात्री जावे लागत असल्याने १० वर्षांपूर्वी शस्त्र परवाना घेतला. पण त्यासाठी लाख रुपयांचे पिस्तूलही घेतले. आता ते पिस्तूल बाळगणे म्हणजे जोखीम होऊन बसले आहे. कोणतीही निवडणूक आली की, शासनाचे आदेश निघतात. त्यामुळे पिस्तूल जमा करावे लागते. त्याशिवाय घराबाहेर पडताना शहरातल्या शहरात ते बाळगण्याची आवश्यकता नसल्याने घरात ठेवले जाते. घरात ठेवतानाही पिस्तूलमध्ये काडतूस नाही ना याची खात्री करावी लागते. घरात वाढत्या वयाची मुले आहेत. चुकूनही त्यांच्या हाताला किंवा त्यांना ते पिस्तूल दिसणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. गेल्या १० वर्षांत त्याची गरज भासेल, सुदैवाने असा एकही प्रसंग घडला नाही. त्यामुळे आता इतकी मोठी रक्कम या पिस्तुलामध्ये गुंतून पडली असल्याचे वाटते.
शहरातील परवानाधारक - १२ हजार