पुणे : उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसू लागला आहे. धुक्याबरोबर आता पुणे शहरात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी शहरात किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
गेल्या काही दिवसात दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले गेले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेकदा ढगाळ हवामान असल्याने तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे थंडी गायब झाल्यासारखे वातावरण जाणवत होते. परंतु, आता उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने विदर्भ गारठला आहे. पुण्यातही त्याची जाणीव होऊ लागली आहे. सायंकाळनंतर अंगाला झोंबणारे थंड वारे वाहताना दिसत आहे. पुणे शहरात रविवारी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत २.४ अंशाने अधिक आहे.
पुढील चार दिवसात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, किमान तापमान ११ ते १० अंशापर्यंत घटण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.