(डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनावरील औषध सध्या आपल्याकडे नाही. त्यामुळे मास्क हेच एकमेव शस्त्र आहे, हे मागच्या वर्षीपासून वारंवार सांगितले जात आहे. भारतातील
केवळ ४४ टक्के लोक योग्य प्रकारे मास्क घालतात, असे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. डबल मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग अधिक आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अगदी काही मिनिटांमध्येच कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. कितीही ठरवले तरी बाहेरच्या व्यक्तींशी संपूर्ण संपर्क टाळणे शक्य होत नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचा तीन किंवा पाच लेयरचा मास्क वापरणे फायदेशीर ठरते. एकमेकांच्या संपर्कात आलेल्या दोन्ही व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्कचा वापर केल्यास संसर्गाची शक्यता अनेक पटींनी कमी होते, हेही अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
----
आतापर्यंत कोरोनाचा विषाणू ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरतो, हे संशोधनातून सिद्ध झाले होते. आता एरोसोलमधूनही कोरोनाचा प्रसार होतोय, असे सांगितले जात आहे. अशा वेळी डबल मास्क वापरणे कधीही फायद्याचे ठरते. सर्जिकल मास्क आणि एन नाईंटी फाईव्ह मास्क वापरण्याने बराच फायदा होतो. खूप गर्दी असलेल्या ठिकाणी दुहेरी मास्क बंधनकारकच हवे. एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाने मास्क लावला नसेल तरीही संसर्गाचा धोका वाढतो. याउलट दोन्ही व्यक्तींनी दुहेरी मास्क लावले असतील तर संसर्गाची शक्यता अनेक पटींनी कमी होते. आजकाल बाजारात फॅन्सी कापडी मास्क मोठ्या प्रमाणात आले आहेत. मात्र मास्कचा दर्जा आणि तो किती पदरी आहे यावरही त्यापासून मिळणारे संरक्षण अवलंबून असते. सर्जिकल मास्क एकदाच वापरावा आणि तो कापून किंवा तुकडे करून कचऱ्यात टाकावा. अशाने इतर कोणीही त्याचा पुन्हा वापर करण्याची शक्यता उरत नाही.
- डॉ. सुहास नेने, जनरल फिजिशियन
-----
दररोजच्या वापरातला मास्क किमान तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा. आपल्याकडे अनेक लोकांना अद्याप मास्क वापरण्याचे तंत्र कळलेले नाही. अनेकदा लोक एकटे असताना, एकट्याने प्रवास करताना नाक आणि तोंड झाकले जाईल अशा योग्य पद्धतीने मास्क वापरतात. मात्र दुकानात गेल्यावर अथवा कोणालाही भेटल्यावर तोंडावरचा मास्क हनुवटीवर घेऊन बोलायला सुरुवात करतात. अशाने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढते. मास्कने कायम आपले नाक आणि तोंड पूर्ण झाकलेले असले पाहिजे. मास्कचा दर्जाही चांगल्या पद्धतीचा असावा. दोन मास्क वापरताना एक नाका-तोंडावर आणि दुसरा हनुवटीवर अशा पद्धतीने घातलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सध्या कोरोना खूप वेगाने पसरत आहे. संसर्गापासून स्वतःला वाचवायचे असेल तर सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर या तीन उपाययोजना आपल्या सवयीचा भाग झाल्या पाहिजेत.
- डॉ. रोहित औटी, जनरल फिजिशियन
----
शहरातील कोरोनाचे एकूण रूग्ण - ४,३३,०८९
बरे झालेले रूग्ण - ३,८६,१९६
सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - ३९,८३९