पुणे : गेल्या दोन महिन्यांत देशभरात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली असतानाच ऑगस्ट महिन्यात देशभरात सामान्य पावसाची शक्यता असून, ९४ ते १०६ टक्के पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आज हा अंदाज जाहीर केला.
तसेच, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांकरिता हवामान विभागाने ९५ ते १०५ टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत भारतात सरासरी ४२८.३ मिमी पावसाची शक्यता आहे. यंदा या दोन्ही महिन्यांत सरासरीपेक्षा किंचित कमी प्रमाणात पाऊस पडेल. ला नीना पुन्हा उभारण्याची स्थिती असून हिंदी महासागरात नकारात्मक स्थिती मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात असण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट्र महिन्यात मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण छत्तीसगड आणि लगतचा विदर्भ, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, गोवा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण दक्षिण भारत, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, उत्तर जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम गुजरातमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सप्टेंबर महिन्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ते सामान्य राहण्याची शक्यता आहे.