पुणे : मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक भागात मॉन्सूने बुधवार जोरदार आगमन झाले असून पावसाने कोकणासह मुंबईला झोडपून काढले आहे. सांताक्रूझमध्ये अतिवृष्टी झाली असून सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगडमध्ये गुरुवारी रेड अलर्ट दिला असून संपूर्ण कोकणात पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकणात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत बेलापूर, कणकवली, पनवेल, रत्नागिरी येथे ११०, श्रीवर्धन १००, अलिबाग, मुंबई ८०, भिवंडी, गुहागर, हर्णे, मार्मागोवा, मुरुड ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, ओझरखेडा ३०, मुक्ताईनगर २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भातील अकोला ७०, जिवंती ५०, अंजनगाव, चिखलदरा, चिखली, दारव्हा, मानोरा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
घाट माथ्यावरील डुंगरवाडी ९०, ताम्हिणी, भिरा ८०, धारावी ७०, दावडी, कोयना (नवजा) ५०, कोयना (पोफळी) ४०, लोणावळा, शिरगाव ३० मिमी पाऊस झाला आहे.
सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस झाला. सांताक्रुझ २२१, मुंबई (कुलाबा) ४६, अलिबाग ३८, रत्नागिरी ५, डहाणु ४१, महाबळेश्वर २१, सातारा ३, अकोला १, अमरावती ३, नागपूर ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
येलो अलर्ट....रायगड जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट दिला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात गुरुवारी वादळी वार्यासह पावसाचा शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जून दारम्यान पावसाचा इशारा दिला आहे. गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ११ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यतापुणे शहर व परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत पुणे ३ व लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...मॉन्सूनचे विदर्भात आगमनकोकण, मुंबईबरोबरच आज विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनने गुरुवारी तेलंगणाचा काही भाग, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील आणखी काही भाग, बंगालच्या उपसागरातील मध्य व उत्तर भागातील बहुतांश भागात प्रवेश केला आहे. बालसर, मालेगाव, नागपूर, भद्राचलम, तुरी अशी मॉन्सूनची सीमारेषा आहे.