पुणे : भारतीय हवामान विभागाने दीर्घ कालावधीसाठी जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज ९७ टक्के व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात पाऊस ९१ टक्के पडला असून हवामान विभागाचा हा अंदाज तब्बल ६ टक्क्यांनी चुकला आहे. ईशान्य भारतात सर्वात कमी पाऊस झाला असून या भागाचा अंदाज तब्बल १७ टक्क्यांनी चुकला आहे. मान्सूनच्या चार महिन्यात भारतात पडणाºया सरासरी पावसापेक्षा यंदा ९ टक्के पाऊस कमी पडला़ त्यामुळे देशाच्या अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती असून उत्तर भारत, मध्य भारतात असंख्य जिल्ह्यात दुष्काळग्रस्त झाले आहेत. मान्सूनच्या चार महिन्यातील पावसाचा आढावा हवामान विभागाने रविवारी जाहीर केला़ त्यात हवामान विभागाने हा अंदाज केवळ संपूर्ण भारतासाठी आणि चार व्यापक विभागासाठी दिलेला होता़ राज्य पातळी किंवा जिल्हास्तरीय दीर्घकाळाचा अंदाज जाहीर केला जात नाही़ त्यासाठी सध्या पुरेसे कौशल्य उपलब्ध नसल्याची जाहीर कबुली दिली आहे़ ईशान्य भारतात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ प्रत्यक्षात ७६ टक्के पाऊस पडला़ तसेच मध्य भारतात ९९ टक्के पावसाचा अंदाज होता़ प्रत्यक्षात ९३ टक्केच पाऊस पडला. महाराष्ट्र हा मध्य भारताचा भाग असल्याने त्याचा स्वतंत्र अंदाज जाहीर केला जात नाही़ महाराष्ट्रात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला़ सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात पडला असून तेथे सरासरीच्या २२ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यात बहुतांश मराठवाड्यातील जिल्हे आहेत़ इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारण पाऊस पडला आहे़ एखाद्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी अथवा अधिक पाऊस पडला तर तो हवामान विभागाच्या दृष्टीने सर्वसाधारण मानला जातो़ १९ टक्क्यांपेक्षा अधिक किंवा कमी झाला तर जादा किंवा कमी पाऊस म्हटले जाते. बी बियाणे व खतांच्या कंपन्यांचा फायदा व्हावा, यासाठी हवामान विभागाकडून जाणीवपूर्वक चांगला पाऊस होईल, असे वृत्त दिल्या जात असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे़ या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनचा तब्बल ६ टक्क्यांनी हवामान विभागाचा अंदाज चुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 7:46 PM