लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : मान्सूनच्या वाटचालीमध्ये रविवारी काहीच प्रगती झालेली नाही. विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मात्र पाऊस होत आहे. त्याचाही जोर कमी झाला असून, काही भागांत मात्र वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. खान्देश आणि पूर्व विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट आहे.