पुणे : नवीन मित्र मैत्रिणी किंवा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲपचा वापर करत असाल तर सावधान! कारण तुमची फसवणूक होऊ शकते. सध्या समलैंगिक, उभयलिंगी, तृतीयपंथी यांसाठीच्या ‘ग्रींडर’ ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. ‘ग्रींडर’ ॲप हा एकप्रकारे हनी ट्रॅपचाच प्रकार असून, याद्वारे पुण्यासह नागपूर आणि दिल्लीमधील अनेकांना गंडा घालण्यात आल्याचे तक्रारी आल्याने सायबर क्राईमच्या रडावर हे ॲप आले आहे.
मोबाईल ही तरुणपिढीसाठी चोवीस तासांची गरज बनली आहे. ‘ग्रींडर’ हे एलजीबीटीक्यू समुदायाचे एक मोफत डेटिंग ॲप आहे.
अशी होते फसवणूक‘ग्रींडर’ या ॲपद्वावरे तरुण-तरुणीशी ओळख निर्माण केली जाते. सुरुवातीला त्यांच्याशी छान संवाद साधत एक मैत्रीपूर्ण नाते तयार केले जाते. त्यानंतर काही दिवसात त्या व्यक्तीला एका अज्ञातस्थळी डेटवर बोलावले जाते.
ती व्यक्ती तिथे आल्यावर तिचे अपहरण करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात किंवा शरीरसंबधांच्या बहाण्याने या व्यक्तींचे छुपे व्हिडिओ काढले जातात. त्यानंतर याच व्हिडिओच्या आधारे त्यांना धमकावून किंवा मारहाण करून लुटले जाते.
पुण्यातही तरुणाचे अपहरण करून लुटले- ग्रींडर डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याचे अपहरण करून लुटणाऱ्यांचा पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. - यापूर्वीही नागपूरमध्ये या ॲपवरून संपर्क साधत एका तरुणावर घातक हल्ला करत त्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता.- या हल्ल्यात २१ वर्षीय तरुण थोडक्यात बचावला होता. दिल्लीतही १५० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती सायबर क्राईमच्या सूत्रांनी दिली.
ग्रींडर डेटिंग ॲप अगर इतर कोणत्याही ॲपद्वारे संपर्कात येऊन कोणत्याही नागरिकांना लुटण्यात आले असल्यास अगर ब्लँकमेल केले जात असल्यास त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
धोक्याची घंटामित्र-मैत्रिणी आणि जोडीदार शोधण्यासाठी विविध चॅटिंग आणि डेटिंग ॲपचा वापर करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, हीच तरुणाईसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. सायबर चोरट्यांनी या डेटिंग ॲपला लक्ष्य केले आहे.
ॲप ही लोकांशी जोडण्यासाठीची एक मोडस ऑपरेंडी आहे. आज ग्रींडरसारखे अनेक ॲप उपलब्ध आहेत. एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा फोटो लावायचा. त्यांना समोरच्या व्यक्तीशी चॅट करायला लावले जाते. त्यानंतर डेटिंगसाठी बोलावले जाते. काहीवेळा आर्थिक देवाणघेवाण होते. मात्र, कुणी एकांतात भेटायला बोलावत असेल तर सार्वजनिक ठिकाणी भेटण्याचा आग्रह धरला पाहिजे. कित्येकदा इंटरनेट वर जे दिसते ते तसे असतेच असे नाही. डेटिंग ॲपवर चॅटिंग करताना संबधित व्यक्ती म्युच्युअल फ्रेंड लिस्टमध्ये आहे का ते पाहावे. कुणालाही मोबाईल क्रमांक, कुटुंबाचे फोटो वैयक्तिक फोटो शेअर करू नयेत- ॲड. गौरव जाचक, वकील