अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र व प्रकल्प संचालक, आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार घेण्यात आले. या वेळी कृषिविज्ञान केंद्रप्रमुख डॉ. रतन जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मधमाश्यांचे महत्त्व या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी आत्मा विभागातील विविध योजना व मधमाशी पालन बाबत शेतकऱ्यांना संबंधित केले.
कृषी विज्ञान केंद्र पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतकऱ्यांना पीक उत्पादनात मधमाशीचे महत्त्व, मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ, मधमाश्यांच्या विविध कीड व रोग व कृषी विज्ञान केंद्रामध्ये चालू असलेले विविध मधमाशी प्रकल्प यामध्ये अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, मधुसंदेश, ग्रामीण युवकांसाठी मधमाशी पालनबाबत प्रशिक्षण, स्किल इंडियाचे मधमाशीपालन प्रशिक्षण याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये मधुमक्षिका पालक म्हणून हेमंत निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना मधमाशीचे अर्थकारण, स्थलांतरित मधमाशीपालन या विषयावर संवाद साधला. प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी अतुल शिंगाडे, सुधीर निगडे, यांनी डाळिंब पिकामध्ये मधमाशीचे महत्त्व व आपले अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडले. यानंतर सूर्यफूल पिकामध्ये परागीभवनासाठी मधमाशीचा प्रयोग करणाऱ्या विलास भगत यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमासाठी १०२ शेतकरी उपस्थित होते.