पुणे : सेंटर फॉर सिटिझन सायन्सच्या (सीसीएस) 'सतर्क' या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून महाराष्ट्रातील पावसाच्या सद्यस्थितीची माहिती देणारी www.citizenweather.in ही वेबसाईट शुक्रवारी सुरु झाली. या वेबसाईटद्वारे नागरिक आणि प्रशासनाला राज्यभरात सध्या कोठे पाऊस सुरु आहे, मोठ्या पावसामुळे काही दुर्घटना घडली आहे का, याची माहिती नेमक्या स्थानासह नकाशावर पाहता येईल.
महाराष्ट्रातील कोणत्याही भागांतील नागरिक या वेबसाईटवर आपल्या भागात सध्या सुरु असलेल्या पावसाची दृश्य स्वरूपातील नोंद एक मिनिटापेक्षा कमी वेळात करू शकतात. त्यांची नोंद तत्काळ गुगलमॅपवर त्यांच्या निरीक्षणाच्या तपशीलासह दिसू लागते. या निरीक्षणांमध्ये पावसाचे स्वरूप, वाऱ्यांचे स्वरूप, पाणी साचणे, फ्लॅश फ्लड, झाडे पडणे, दरड कोसळणे, रस्ता खचणे, भिंत पडणे आदी घटनांचा समावेश आहे. निरीक्षण नोंदवण्यासाठी नागरिकांना त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी 'जीपीएस'ला परवानगी देणे आवश्यक आहे. वेबसाईटला भेट देणाऱ्या सर्वांना गेल्या एक, तीन, सहा आणि बारा तासांतील पावसाच्या नोंदी नकाशावर दिसू शकतात.
या शिवाय वेबसाईटवर सध्याची उपग्रहीय आणि रडार चित्रे, आयएमडीचा पुढील २४ तासांचा पावसाचा अंदाज, हवामानाशी संबंधित उपयुक्त वेबसाईट, आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणारे संपर्क क्रमांक यांचीही माहिती मिळू शकेल. नागरिकांनी नागरिकांसाठी चालवलेला हा उपक्रम असून, आपत्तींमधून जीवित आणि वित्तहानी कमी करणे हा या उपक्रमामागील हेतू आहे. महाराष्ट्रातील अधिकाधिक नागरिकांनी, सातत्याने या वेबसाईटवर आपल्या भागातील पावसाची माहिती देत राहावी अशी सतर्कतर्फे आम्ही विनंती करतो.