पुणे : लग्नकार्यातील पाहुण्यांच्या उपस्थितीच्या संख्येबाबतचे शासकीय नियम दिवसागणिक बदलत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात रेडिमेड लग्नपत्रिका छापण्याची क्रेझ कमी झाली असून, ‘ऑनलाईन’ लग्नपत्रिकांचा सुटसुटीत मार्ग कुटुंबीयांनी निवडला आहे.
लग्नकार्याच्या आमंत्रणासाठी व्हॉट्सॲपवरील डिझाईन पत्रिका तयार करून घेण्याचा नवा ट्रेंड रुजला आहे. दरम्यान, लग्नकार्यात शंभर जणांचीच परवानगी असल्यामुळे तेवढ्याच पत्रिका छापून घेतल्या जात असल्याने लग्नपत्रिकांच्या व्यवसायाची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. या रेडिमेड पत्रिकांचे करायचे काय? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.
एकेकाळी लग्न निश्चित झाल्यानंतर वधू-वराकडील मंडळींचा मोर्चा लग्नपत्रिकांच्या दुकानाकडे वळतो. मग वैविध्यपूर्ण, आकर्षक रंगसंगतीच्या रेडिमेड लग्नपत्रिकांची डिझाईन्स कुटुंबांना दाखविली जातात आणि त्यातील एका लग्नपत्रिकेची निवड केल्यानंतर ती पत्रिका वधू-वरासह कुटुंबांची माहिती समाविष्ट करून छपाईसाठी दिली जाते. अगदी ५०० ते १००० पर्यंत लग्नपत्रिका छापण्याकडे कुटुंबीयांचा कल असतो. पण कोरोनाकाळात लग्नसोहळ्याची समीकरणेच बदलली आहेत. कधी दोनशे तर कधी शंभर असे शासनाचे लग्नसोहळ्यातील नियम बदलत आहेत. त्यामुळे पत्रिका छापण्याच्या फंदात न पडता व्हॉट्सॲपवर पत्रिका पाठविण्याकरिता पत्रिका डिझाईन करून छापून घेण्यास कुटुंबीयांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये मग वधू-वराच्या फोटोसह काव्यपंक्ती असा हवा तसा मजकूर टाकला जात आहे. मात्र या व्हॉट्सॲप पत्रिकांमुळे रेडिमेड पत्रिकांची मागणी पूर्णत: कमी झाली असून, नवीन पत्रिकांच्या डिझाईन्सचा स्टॉक व्यावसायिकांनी भरलाच नसल्याचे सांगण्यात आले आहे.
रेडिमेड लग्नपत्रिकांची मागणी कमी झाली आहे. अगदी पाच, अकरा, एकवीस आणि क्वचितच शंभर पत्रिका छापून घेतल्या जात आहेत. त्यामुळे पत्रिकांचे मार्केट ठप्प झाले आहे. आम्ही दिल्ली, मुंबईमधून रेडिमेड पत्रिका मागवतो आणि त्याची विक्री करतो. पण दोन वर्षांत नव्या पत्रिका मागविलेल्याच नाहीत. त्यामुळे सध्या जुनाच स्टॉक आम्ही संपवत आहोत. यातच आता व्हॉट्सॲप पत्रिकांचा ट्रेंड देखील वाढलाय. म्हणजे छपाईची भानगडच नाही.
- श्रीकांत घोरपडे, पत्रिका डिझाईनर
शासनाचे सातत्याने बदलणाऱ्या नियमांमुळे नक्की किती पत्रिका छापायच्या याचा अंदाज येत नाहीये. त्यापेक्षा व्हॉट्सॲप पत्रिका पाठविणे अधिक सोयीचे आहे. हवी तशी पत्रिका करून घेऊ शकतो.
- सुमित पारखी, तरुण