जेजुरी : जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील पिसर्वे येथील एका लग्नघरातील कपाटामध्ये ठेवलेले २० तोळे सोन्याचे सुमारे पावणेपाच लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले. ही घटना मंगळवारी (दि. २) मध्यरात्री २ :३० ते सकाळी ८:३० च्या दरम्यान घडली असून, याबाबत चांगदेव रामचंद्र कोलते (मूळ रा. पिसर्वे, सध्या रा. कृष्णानगर, चिंचवड प्राधिकरण) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी : चांगदेव कोलते यांचे पुतणे विवेक गणपत कोलते यांचे १ मे रोजी लग्न होते. त्यानिमित्त घरामध्ये पै-पाहुणे आलेले होते. लोणी काळभोर येथे लग्न उरकल्यानंतर, पिसर्वे येथे रात्रीच्या वरातीचा कार्यक्रम सर्वांनी पाहिला, त्यानंतर सर्व जण झोपी गेले. मंगळवारी (दि. २) सकाळी ८ :३०च्या दरम्यान कोलते यांच्या पाहुण्या सविता राजेंद्र घाडगे यांनी कोलते यांच्या चुलत सून प्रिया प्रसाद कोलते यांच्याकडे रात्रीच्या वेळी कपाटामध्ये ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने मागितले. मात्र, प्रिया कोलते यांनी बेडरूममधील कपाट उघडून पाहिले असता सोन्याचे दागिने कपाटामध्ये आढळून आले नाहीत. शिवाय, अनुराधा गणपत कोलते यांचेही दागिने आढळून आले नाहीत. गुरुवारी (दि. ४) पुणे येथून ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते.
लग्नघरातून वीस तोळे सोन्याचे दागिने लंपास
By admin | Published: May 05, 2017 2:20 AM