पुणे : शहरातील नव्या कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी शहरात बाधितांची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे़ २८ नाेव्हेंबरनंतर शहरात प्रथमच आज ४२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ९.९४ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: नोव्हेंबर महिन्यानंतरची शहरातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. शहरातील कोरोना तपासणीचे प्रमाणही बुधवारी वाढले असून, शहरातील १७ स्वॅब सेंटरवर दिवसभरात ४ हजार ३०४ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ८८१ वर गेली असून, २९० रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत़ तर विविध रुग्णालयांमध्ये १४५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत १० लाख ८१ हजार ११५ हजार जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ९५ हजार ९२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़