पुणे : राज्यातील कोरोनाचा पहिल्या रुग्ण पुण्यात आढळून आल्यानंतरची सर्वाधिक रुग्णवाढ बुधवारी नोंदविली गेली. शहराच्या सर्वच भागांमध्ये हे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण असून त्या खालोखाल नगर रस्ता-वडगाव शेरी, औंध-बाणेर, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांचा क्रमांक लागला आहे. गेल्या काही दिवसात हडपसर परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण नोंदविल्या गेलेल्या भवानी पेठेच्या हद्दीत मात्र सर्वात कमी रुग्ण आहेत.
शहरातील आॅक्टोबरनंतरची कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यात वाढण्यास सुरुवात झाली आहे. नव्या रुग्णांची दिवसाला १५०० च्या पुढे वाढते आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आल्यानंतर रुग्ण वाढत गेले. जून-जुलैमध्ये हे प्रमाण वाढले होते. गणेशोत्सवानंतर मात्र दिवसाकाठी दोन हजारांपर्यंत रुग्ण वाढ होत होती. या काळात रुग्णवाढीचा वेग वाढला होता. १६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक २ हजार १२० रुग्णांची वाढ नोंदविण्यात आली होती.
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून शोधण्यात आले. संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. यासोबतच स्वॅब कलेक्शन सेंटर, विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर, जम्बो रुग्णालयाची उभारणी, खासगी रुग्णालयासोबत करार, विलगीकरण कक्ष, मास्क कारवाई आदी उपाययोजनांमुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. ऑक्टोबरनंतर हा आकडा कमी होण्यास सुरुवात झाली होती. जानेवारी महिन्यात दिवसाकाठी १०० ते १५० रुग्ण आढळण्यापर्यंत आकडा खाली गेला होता.
परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची ७ फेब्रुवारी रोजीची बाधितांची संख्या १९६ होती. ती मागील महिन्याभरात दोन हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
====
क्षेत्रीय कार्यालय १६ मार्च, १७ मार्च
औंध-बाणेर १८१ २३१
भवानी पेठ ५७ १०८
बिबवेवाडी ९७ २००
धनकवडी-सहकारनगर १७५ २१५
ढोले पाटील रस्ता ७७ १०१
हडपसर-मुंढवा २३१ ३०२
कसबा-विश्रामबाग १२२ १३०
कोंढवा-येवलेवाडी ८८ १४२
कोथरुड-बावधन १०६ १४९
नगर रस्ता-वडगाव शेरी २०० २८०
शिवाजीनगर-घोले रस्ता ८१ ११५
सिंहगड रस्ता १५० १७७
वानवडी-रामटेकडी ८७ ८८
वारजे-कर्वेनगर १८२ २११
येरवडा-कळस-धानोरी ९१ १३८
एकूण १९२५ २५८७