पुणे : कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची संख्या एक हजाराच्या आत आल्यावर, बुधवारचा दिवसही पुणेकरांसाठी आणखी एक सुखदवार्ता घेऊन आला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याची सुरूवात झाल्यापासून शहरात आज (दि़२०) तब्बल वीस महिन्यांनतर तीन अपवाद वगळता प्रथमच कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
शहरात ३० मार्च, २०२० रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर १९ व २० एप्रिल, २०२० रोजीचा अपवाद वगळता कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरात दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होत राहिला. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६ फेब्रुवारी, २०२१ चा अपवाद वगळता शहरात सातत्याने कोरोनामुळे मृत्यू होत राहिले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मे, २०२१ रोजी एकाच दिवशी ९३ कोरोनाबाधितांचा शहरात मृत्यू झाला होता. शहरात ३० मार्च, २०२० पासून २० ऑक्टोबर, २०२१ पर्यंत वीस महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.