लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबईवगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का निर्णय कळेल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. यामुळेच पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांसाठीची वॉर्डरचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबईवगळता अन्य सर्व महापालिकांसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी प्रदेश कॉंग्रेसने कार्यकारिणीची बैठक घेऊन राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. महापालिका निवडणुकांसाठी दोन सदस्यांचा एकच प्रभाग करावा, अशी मागणी केली होती तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. असे असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.
कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले असता पवारांनी ‘थोडे थांबा’ असे वक्तव्य केले. पवार म्हणाले,‘‘ काही वाद होणार नाही. आमच्या सहकारी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. ती त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून सामंजस्याने मार्ग काढू. निवडणुका आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे, त्यावर विचारले असता पवार म्हणाले,‘ निवडणूक आयोग त्यांचे काम करत आहे. ती स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्यांचे ते भूमिका घेऊ शकतात.
-----------
मुळशी धरणातून पुण्यासाठी लवकरच निर्णय
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा, अशी सूचना केली आहे. गडकरी यासाठी काहीसे आग्रही दिसत आहेत. पण सध्या वाढत्या पुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी घेऊन काही भागांचा प्रश्न मार्गी लावला आहे. टाटांच्या मुळशी धरणातून पाणी घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. यासंदर्भातील एक अहवाल लवकरच शासनाकडे दाखल होणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. यामुळेच नवीन पुण्याचा विचार करताना सर्वांत प्रथम पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे खूप आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.