धनकवडी: कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह शहर व उपनगरात विकेंड लॉकडाउन सुरु असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा काल सायंकाळी ६ पासून बंद करण्यात आली आहेत. आज सकाळ पासून रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला होता. धनकवडीत नागरिकांचे विकेंड लॉकडाऊन उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून आले आहेत. एकूणच वीकेंड लॉकडाउच्या निमित्ताने गेल्या वर्षी च्या लॉकडाउनच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
धनकवडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, बालाजीनगर, सातारा रस्ता परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात, बँरिकेट लावून जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कात्रज मुख्य चौक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय व दत्तनगर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बँरिकेट लावण्यात आले आहेत. जे लोक कामा साठी बाहेर पडत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे. त्याच बरोबर धनकवडी सहकारनगर भागात सुद्धा सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून सातारा रस्ताअहिल्या देवी चौक, ट्रेझर पार्क व शिंदे हायस्कूल परिसरात बँरिकेट लावून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे.
एकंदरीत दोन्ही ही ठिकाणी नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना बाहेर फिरण्यास अटकाव केला जात आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच रिक्षा प्रवास सुरु आहे. परंतू संचारबंदीमुळे लोक घरातच असल्याने या सुरु असलेल्या सेवांना ही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र उपनगरांमधील विविध भागात दिसून येत आहे.