लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : आजपासून राज्यातील शेतकरी संपावर गेल्याने जेजुरी येथील गुरुवारचा आठवडे बाजार भरला नाही. अनेक शेतकरी बाजारमाल विक्रीसाठी घेऊन आले होते. परंतु, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घरी पाठवले. संपात सहभाग घेऊन अनेक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. व्यापाऱ्यांकडून बाजारात माल विक्री करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला. सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शासनाला जागा आली पाहिजे, पुढील सात दिवस शेतकरी कडकडीत बंद पाळतील, व्यापारी ही त्यांना सहकार्य करतील, असे गिरीश राऊत, संदीप चिकने, रोहिदास कुदळे, रामभाऊ माळवदकर पाटील यांनी सांगितले. बाजार भरणार नाही ही शक्यता गृहीत धरून अनेक ढाबा व उपहारगृह व्यावसायिकांनी अगोदरच भाजीपाला खरेदी करून ठेवला आहे. येथे औद्योगिक वसाहत असल्याने कामगारांची संख्या मोठी आहे. जेजुरीचा आठवडे बाजार हा खूप मोठा भरतो, पूर्व पुरंदर तालुक्यातून येथे माल विक्रीला येतो, मोठी आर्थिक उलाढाल होते. ग्रामस्थ, कामगार आठवडा बाजारातून चार -पाच दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करतात. मात्र, आज बाजार बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचे धान्य व भाजीपाला न मिळाल्याने हाल झाले. काही शेतकऱ्यांनी आपला माल घरी परत नेऊन फेकून देण्यापेक्षा खंडोबा गडाच्या पायथ्याशी जाऊन विक्री केला. भाविक या भाजीपाल्यावर तुटून पडले होते. उद्यापासून कडकडीत संप सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
जेजुरीच्या आठवडे बाजारात शुकशुकाट
By admin | Published: June 02, 2017 1:58 AM