लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारात आपला माल विकण्यासाठी आले होते. दुपारनंतर बाजार फुल्ल झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या ११ महिन्यांपासून बाजार बंद होता. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. गेले वर्षभर आठवडे बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. आता बाजार सुरू झाल्याने शेतमालासह इतर वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. बाजार सुरू झाल्याने गृहिणीही खूश झाल्या आहेत. बाजारात फिरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
बाजार सुरू झाल्याने इतर व्यापारावरही त्याचा अनुकूल परिणाम होत आहे. बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीला करातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, शेतमजुरांचे पगार, व्यापारी व दुकानदार यांचे व्यवहार कोलमडले होते. ते आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे चक्र बंदमुळे रुतले होते, ते बाजार सुरू झाल्याने निश्चितच बाहेर निघून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल. लॉकडाऊन व संचारबंदीची झळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसली होती. परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले होते. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामुळे गावातील अर्थव्यवस्था आठवडा बाजारावर अवलंबून असते. कारण दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते.
लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या गावांमध्ये रोजची भाजीपाल्याची मंडई भरते. परंतु या रोजच्या मंडईला आठवडा बाजाराची सर काहीकेल्या येत नाही. या बाजारात भाजीपाल्यासह नवे जुने कपडे, भेळ, जिलेबी, लाडू विक्री करणारी छोटी छोटी हाॅटेल, चादर, बेडसीट, जर्किन, स्वेटर, फुटाणे आदी सर्व प्रकारचे विक्रेते असतात. शासनाच्या निर्णयामुळे आठवडा बाजार बंद झाल्यावर या सर्व विक्रेत्यांपैकी भाजीपाला विक्रेत्यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीची रोजची मंडईमध्ये तसेच कवडीपाट टोलनाक्याजवळ भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु काल पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन सर्वांना तेथून हटवले आहे. त्यामुळे आज लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची भरपूर गर्दी झाली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींचे पाच कर्मचारी बाजारात उपस्थित असलेले विक्रेते व खरेदीसाठी आलेले ग्राहक यांना सोशल डिस्टंन्स पाळण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याबाबत आवाहन करताना दिसत होते.
लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या आठवडा बाजारात सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची झालेली मोठी गर्दी.