न्हावी - इंदापूर तालुक्यातील उजनी धरण क्षेत्रात बेकायदेशीररीत्या परप्रांतीय मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. मात्र, इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी काट्यावर मासळी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य धरणग्रस्त मच्छीमारांवर जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी अरेरावीची भाषा करून कायद्याचा बडगा उगारत आहेत.याउलट जे स्थानिक धरणग्रस्त मच्छीमार आहेत, त्यांना कायद्याचा धाक दाखवून आणि अरेरावीची भाषा वापरून परवाना पास फाडून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा तगादा सुरू आहे. वास्तविक स्थानिक धरणग्रस्त मच्छीमार लोकांचा परवाना फाडण्यास कोणताही विरोध नाही. मात्र, जे परप्रांतीय मच्छीमार उजनी धरणात कोणताही अधिकारनसताना शासकीय नियम पायदळी तुडवून बेसुमार मच्छीमारी करीत आहेत, अगोदर त्यांच्यावर आणि त्यांना घेऊन येणाºया गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारांवर कारवाई करा, तेव्हाच आम्ही परवाना पास काढू, असा पवित्रा स्थानिक धरणग्रस्त मच्छीमारांनी घेतला आहे.उजनी धरण क्षेत्रात मासेमारीसाठी स्वतंत्र मत्सविभाग असताना केवळ धरण सुरक्षिततेच्या नावाखाली हे धरण जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. हे जर असेच चालू राहिले तर स्थानिक मच्छीमारावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नसल्याची खंत येथील मच्छीमारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.राज्यातील उजनी धरण हे सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे धरण आहे. यावर विविध लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, याच उजनी परिसरात बेकायदेशीर आलेल्या परप्रांतीय मच्छीमारांकडून बेसुमार मत्स्यखाद्य व मत्स्य बीज मारले जात आहे. तसेच भरमसाठ मासे पकडून मोठे होण्याच्या हव्यासाने या परप्रांतीय मच्छीमारांकडून विविध प्रकारची विषारी रसायने भातात मिसळून ते पाण्यात टाकून मासळी पकडून ती तालुक्यातल्या नजीकच्या काट्यावर लिलाव करून रातोरात मालामाल होत आहेत.या सर्व गोष्टींची कल्पना जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना आहे. मात्र, या लोकांकडून ठरलेली माया वेळोवेळी घरपोच होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.
उजनी जलाशयात परप्रांतीय मच्छीमारांची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:24 AM