मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 06:00 AM2020-01-14T06:00:00+5:302020-01-14T06:00:08+5:30

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बंद पडणाऱ्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळेल..

Welcome to the announcement to make Marathi subjects compulsory | मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा

मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

पुणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेचे मराठी भाषा अभ्यासकांकडून स्वागत केले जात आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल. समाजात मराठी भाषेचे महत्त्वही अधिक अधोरेखित होईल. बंद पडणाऱ्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळेल.परंतु, केवळ घोषणा न करता शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा मराठी भाषेच्या अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मराठी शाळांचे सक्षमीकरण करणे गरजेचे झाले आहे. पालकांकडून मराठी माध्यमाच्या शाळांऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पसंती दिली जात आहे. परंतु, या शाळांमधील काही विद्यार्थ्यांना मराठी लिहिता व वाचता येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे इंग्रजी,उर्दू , हिंदी आदी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याच्या वक्तव्यामुळे मराठी भाषा अभ्यासकांत व मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ही घोषणाच राहू नये यासाठी येत्या अधिवेशनात त्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.सदिप सांगळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे एक आशादायी चित्र निर्माण झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास मराठी भाषिक प्रेमी सत्ताधाºयांचे ॠणी राहतील. भारतीय जनता पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता होती. भाजपने राजकीय इच्छाशक्ती दाखवत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला हवा होता. भाजपला त्याचा राजकीय फायदाही झाला असता. इतर राज्ये त्यांच्या भाषेबद्दल आग्रही असतात. मात्र, आपण आग्रही भूमिका न घेतल्याने मराठी भाषा उपेक्षित राहिली. या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमाचे अनावश्यक ‘फॅड’ कमी होईल. तसेच इंग्रजी माध्यमात काम करणाºयांना सुध्दा मराठीचे महत्त्व पटेल. खरेतर मराठी विषय पदवी अभ्यासक्रमापर्यंत अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल आणि मराठीला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होईल.
.........
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या भोवतालच्या समाजाशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. भाषा शिकवणे म्हणजे विद्यार्थ्याला सक्षम करण्यासारखेच आहे. त्यामुळे कोणतीही भाषा कशासाठी शिकवली जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याशिवाय भाषेची किंमत समजणार नाही. प्रत्येकाला चांगला संवाद साधला आला पाहिजे. त्यासाठी समाजाची भाषा शिकणे आवश्यक आहे. कोणतीही भाषा शाळांमध्ये सक्तीने शिकवली जात नाही तर एक नवी भाषा शिकण्याची संधी आपल्याला मिळत आहे. या दृष्टीकोनातून संबंधित भाषेकडे पाहिले पाहिजे. 
- डॉ. विद्यागौरी टिळक, माजी मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
......................
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेचे सर्वांकडून स्वागतच केले जात आहे. मराठी शाळांसाठी या निर्णयाची नित्तांत गरज आहे. मराठी ही राजभाषा, लोकभाषा व संवाद भाषा आहे. मराठी भाषा शिकवली जात नसणा-या शाळांमध्ये मराठी शिकवलीच पाहिजे. इतर राज्यांकडून आपल्या भाषेचा नेहमी आग्रह धरला जातो.आपणही मराठीचा आग्रह धरला पाहिजे.यापूर्वीही अशा घोषणा झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही,याचा खेद वाटतो. परंतु,आता या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.- डॉ.न.म.जोशी ,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ.
................
राज्य शासनाने केवळ दहावीपर्यंत नाही तर बारावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करावा.मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असून त्या बंद पडण्यासाठी खतपाणी घातले जात आहे. शाळा महाविद्यालयातही मराठी ऐवजी संस्कृत किंवा परकीय भाषा घेण्याबाबत काही शिक्षक आग्रह करतात. त्यास विद्यार्थी व पालक बळी पडतात. तसेच इंग्रजी शाळांमधून विद्यार्थ्यांनी घरी इंग्रजीमध्ये संवाद साधावा, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटते. मागील सरकारने सुध्दा मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती. परंतु, त्याबाबत निर्णय घेतला नाही. या शासनाने ठोस निर्णय घेतला तरच विश्वास ठेवता येईल.
- डॉ. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद.
.........................
सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य केला तर त्याचे स्वागतच आहे. परंतु,सध्या मराठी शाळांची स्थिती वाईट आहे.इंग्रजी माध्यमाच्या दहावीतील विद्यार्थ्याला पाच मराठी वाक्य लिहिता येत नाहीत.गेल्या वर्षी सुमारे अडीच ते पाऊणे तीन लाख विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले.त्यामुळे मराठी विषय योग्य पध्दतीने शिकवण्याबाबत आवश्यक कार्यवाही होणे गरजेची आहे.तसेच नवीन मराठी शाळांना परवानगी देण्याबाबत आणि सध्य असित्वात असणा-या शाळा जगविण्याबबात शासनाने आवश्यक कार्यवाही करावी. 
- डॉ.अ.ल.देशमुख,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Web Title: Welcome to the announcement to make Marathi subjects compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.