लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोथरूडच्या जयाबाई सुतार दवाखान्यात कोरोना लशीचे शनिवारी (दि. १६) सकाळी पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आले. दवाखान्यातील मुख्य परिचारिका मंदाकिनी कवतिके यांनी रुग्णालयातल्याच परिचारिका कल्पना जाधव यांना पहिली लस दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाधव यांचे कौतुक केले.
संपूर्ण रुग्णालयच कोरोना लसीकरणासाठी सजवण्यात आले होते. कोरोना लसीचा संदेश देणारी मोठी रांगोळी आवारात काढण्यात आली होती. विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली टिळेकर, दवाखान्याचे प्रमुख डॉ. सोहम पडवळ सगळीकडे देखरेख करत होते. दवाखान्याच्या प्रवेशद्वारापासून ते थेट कोरोना लस देणाऱ्या कक्षापर्यंत सगळीकडे कर्मचाऱ्यांनी रांगोळी व फुलांची सजावट केली होती.
लस घेणाऱ्या १०० आरोग्य सेवकांची यादी तयार होती. साडेनऊ वाजता लशीचे बॉक्स रुग्णालयाच्या आवारात आले. फुलांची उधळण करत ते रुग्णालयात आणले गेले. बरोबर सव्वाअकरा वाजता लसीकरणास सुरूवात करण्यात आली. कल्पना जाधव यांना लस देताना मंदाकिनी कवतिके यांनी त्यांना लस कशाची आहे, कशाकरता दिली जात आहे, काळजी कशी घ्यायची ही माहिती दिली.
पहिल्या लसीकरणानंतर लगेचच अनिल ठोंबरे आणि अन्य तिघांंना लस देण्यात आली. लस घेतलेल्यांना रुग्णालयातील निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले. तिथे जाधव, ठोंबरे व लस घेणाऱ्या अन्य व्यक्तींना बसवण्यात आले. डॉ. टिळेकर, पडवळ यांनी त्यांची विचारपूस केली व त्यांना आराम करण्यास सांगितले.
दुपारी १२ वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दवाखान्यास भेट दिली. त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक दीपक मानकर, पृथ्वीराज सुतार, दिलीप वेडे, वासंती जाधव, हर्षाली माथवड, अल्पना वर्पे, वैशाली मराठे, छाया मारणे, दत्ता सागरे आदी होते. या सर्वांनी लस घेतलेल्यांची विचारपूस केली व लसीकरण यशस्वी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लस टोचण्यात आलेल्या कोणालाही अर्ध्या तासापर्यंत कसलाही त्रास झाला नाही. कल्पना जाधव यांनी तर लगेचच कामाला सुरूवातही केली.
चौकट
कोणालाही नाही त्रास
“आज लस घेतली त्यांच्यापैकी कोणालाच अजून तरी काही त्रास झालेला नाही. तो होणारही नाही याची खात्री आहे. अर्धा तास झाल्यानंतरही आम्ही त्यांच्याकडे पूर्ण दिवसभर लक्ष ठेवून आहोत,” असे डॉ. अंजली टिळेकर यांनी सांगितले.
चौकट
टोचणाऱ्याचा हलका हात
यादीत पहिले नाव एका डॉक्टरांचे होते. मात्र त्यांच्याकडे आधारकार्ड व ओळखपत्रही नव्हते. रुग्णालयातील परिचारिका कल्पना जाधव यांचेही नाव यादीत होते. पहिल्या क्रमाकांकडे आधारकार्ड नसल्याचे लक्षात आल्यावर लगेचच त्यांनी तयारी दाखवली. लस टोचणाऱ्याचा हात हलका असणे गरजेचे असते. सुतार दवाखान्यातील मंदाकिनी कवतिके हलक्या हाताने इंजेक्शन देण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यांनी पहिली लस टोचली.