पुणे : पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन इलेक्ट्राॅनिक बसेसचे पुणेकरांनी आनंदाने स्वागत केले आहे. या ई-बस एसी असल्याने पुणेकरांनी आल्हाददायक प्रवास अनुभवला. आजपासून पुण्यातील विविध मार्गांवर या बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच माेठी गर्दी या बसमधून प्रवास करण्यासाठी हाेत आहे.
पुणे महानगरपालिका, पीएमपी, स्मार्ट सिटी यांच्या एकत्रित प्रयत्नातून ई-बसेस पीएमपीच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 25 बसेस दाखल झाल्या असून येत्या काळात 150 बस दाखल हाेणार आहेत. याबराेबरच स्त्रियांसाठी खास असणाऱ्या तेजस्वीनी बसेससुद्धा आज पासून सुरु करण्यात आल्या आहेत. नरवीर तानाजीवाडी येथून भेकराईनगर येथे जाणाऱ्या बसचे चालक प्रमाेद पाटील म्हणाले, आधीच्या पीएमपी बसेसपेक्षा ही गाडी खूपच उत्तम आहे. संपूर्ण बस ही ऑटोमॅटिक असल्याने सातत्याने गिअर बदलणे, क्लच दाबणे यापासून मुक्ती मिळाली आहे. दरवाजे सुद्धा स्वयंचलित असल्याने प्रवाशांना निर्माण हाेणारा धाेका देखील यामुळे टळला आहे. एसी बस असल्याने प्रवाशांना देखील अल्हाददायक प्रवास करता येताे आहे. तसेच अशा आणखी किती बस दाखल हाेणार याबद्दल नागरिक कुतहलाने विचारत आहेत.
या बसने प्रवास करणारे शंकर बाेनवटे म्हणाले, मी नेहमी बसने प्रवास करताे परंतु आजचा प्रवास सुखःद आहे. संपूर्ण एसी बस असल्याने प्रदूषण, बाहेरच्या गाेंगाटापासून मुक्ती मिळत आहे. त्यातच ही बस इतर बसेसपेक्षा आरामदायी असल्याने प्रवासही चांगला हाेताेय. माळीणवरुन पुण्यात आलेले राजाराम चाेपडे म्हणाले, मी पुण्यात आल्यावर नेहमी रिक्षानेच प्रवास करायचाे, परंतु ही ई-बस सुरु झाल्याचे कळाल्यानंतर आज बसने प्रवास करत आहे. अशी बस मी पहिल्यांदाच पाहताेय. एसी असल्याने बाहेरची धूळ प्रदूषण यापासून रक्षण हाेतंय, तसेच ई-बस असल्याने प्रदूषण देखील हाेणार नाहीये.
याच बसमध्ये बस कंपनीचे काही कर्मचारी बसची पाहणी करण्यासाठी आले हाेते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी अशा बसेस हिमाचल, केरळ, कुलु मनाली आणि मुंबईत सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेस संपूर्ण ऑटोमॅटिक असल्याने कुठलिही अडचण येत नाही. तसेच बसमध्ये कुठलिही तांत्रिक अडचण आल्यास त्याच्याबद्दलची माहिती चालकाला मिळते. या बसला इंजिन नसल्याने ब्रेक डाऊन हाेण्याचा प्रश्न नाही. तसेच ई- बस असल्याने प्रदूषणाला सुद्धा आळा बसणार आहे.