सोमवार (दि २०) हा दिवस समस्त भोरवासीयांनी इतिहासात नोंद करून ठेवला. निमित्त होते, हरयाणा पानिपत स्थित आपल्या रोड मराठा समाजविषयीची नाळ घट्ट करण्याचे. महाराज आणि समस्त मराठा समाजाप्रती असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पाहून भोरमधील समस्त शिवप्रेमींनी एक अनोखा उपक्रम करण्याचे ठरविले. आपले नाते पिढ्यानपिढ्या असेच रहावे, या उद्देशाने हरयाणा, पानिपत येथील रोड मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावरील मूर्ती शिल्पकार दीपक थोपटे यांच्याकडून बनवून घेतली. या कामी भोरमधील मराठ्यांसह इतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. या सर्वांच्या मदतीने मूर्ती बनवली. शिवस्वराज्यभूमी भोर मावळ प्रांत छत्रपतींनी ज्या रायरेश्वरावर शंभू महादेव आणि याच भागातील मावळ्यांच्या साक्षीने स्वराज्याो स्वप्न बघितले आणि सत्यात उतरवले. राजगड, तोरणा, रोहिडेश्वर, केंजळगड त्याबरोबरच अनेक मावळे याच भोर वेल्ह्याच्या मातीतून, याच प्रांतातून ज्या ठिकाणी मराठ्यांचे रक्त सांडले, जिथे लढाई हरूनसुद्धा मराठ्यांचा उद्धार आजही जगात अभिमानाने होत आहे, अशा पानिपत (हरयाणा) मध्ये अखंड हिंदुस्थानाचे दैवत आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्यात येणार आहे. शिवरायांच्या या मूर्तीचे भोरमध्ये स्वागत करण्यात आले. यानंतर ही मूर्ती पानिपतकडे रवाना झाली. २६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे भोरमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:13 AM