नारायण बडगुजर
पिंपरी : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशींकडून जल्लोष केला जातो. यात पार्टी करून मद्यपान केले जाते. यातून काही जण नशेत वाहन चालवितात. परिणामी अपघात होतात. तसेच भर रस्त्यात किंवा वर्दळीच्या ठिकाणी काही अतिउत्साही असलेल्यांकडून वादाचे प्रकार होऊन काही गुन्हे होतात. त्यासाठी पोलिसांकडून ३१ डिसेंबरला सायंकाळपासूनच मोठा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे अशा मद्यपी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांची कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत घरीच करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
३१च्या रात्री अडीच हजार पोलीस रस्त्यावर
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेले १७ पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी, नियंत्रण कक्ष व मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी ३१ डिसेंबरला रस्त्यावर उतरणार आहेत. शहर दलातील अडीच हजारावर पोलिसांचा ३१ डिसेंबरला रात्री बंदोबस्त राहणार आहे.
ब्रेथ ॲनालायझरचा होणार वापर
कोरोना महामारीमुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद आहे. मात्र, सध्या कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. नववर्ष स्वागतानिमित्त काही जणांकडून मद्यपान केले जाते. अशा वाहन चालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई होणार आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरला वाहनचालकांच्या तपासणीसाठी ब्रेथ ॲनलायझरचा वापर करण्यात येणार आहे.
मदतीसाठी पोलिसांना ११२ क्रमांकावर करा काॅल
नववर्ष स्वागतानिमित्त अतिउत्साहात कायद्याचे उल्लंघन केले जाते. काही जणांकडून भर रस्त्यात पार्टी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास होतो. असा प्रकार आढळून आल्यास किंवा पोलिसांची मदत पाहिजे असल्यास ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
नववर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्याल?
पार्टी करून गाडी चालवणे टाळा : अनेक जण पार्टी करण्यासाठी बाहेर जातात. पार्टीमध्ये मद्यपान केले जाते. त्यानंतर नशेतच वाहन चालविले जाते. मद्यपान केल्यानंतर वाहन चालविण्याचे टाळावे.
रस्त्यावर पार्टी नको : अनेकांकडून काॅलनी, वस्ती किंवा गल्लीबोळात तसेच भररस्त्यावर पार्टी केली जाते. काही ठिकाणी इमारतीच्या टेरेसवर देखील पार्टी होते. अशा अवैध पार्टीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा पार्टी करू नयेत.
''नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मद्यपी वाहनचालक तसेच रस्त्याने आरडाओरडा करून गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाचे स्वागत उत्साहात मात्र शांततेत करावे. - डाॅ. काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड''