आळेफाटा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे वडगाव आनंद, आळेफाटा व आळे येथे ग्रामस्थांनी स्वागत केले. घोडेगाव येथील शनिमंदिरात पलंगाची स्थापना होऊन तुळजापूरकडे हा पलंग घेऊन जाण्याची परंपरा यादव काळापासून कायम आहे.
घोडेगाव व जुन्नर येथील विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर या पलंगाचे प्रस्थान झाले. शुक्रवारी दुपारनंतर वडगाव आनंद येथे पलंगाचे आगमन होताच भाविकांनी अंबिकामातेचा जयघोष करीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पलंगाचे स्वागत केले. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.दरम्यान, आळेफाटा येथेही पलंगाचे स्वागत करण्यात आले. आळे येथे या पलंगाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आळे येथील मुक्कामानंतर सकाळी पलंगाचे पुढे प्रस्थान झाले.