पुणे: अतिमहत्वाच्या पदावरील व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था हा आता अतिशय कळीचा मुद्दा झाला आहे. निवडणूक काळात तर तो संवेदनशील होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या प्रचार दौरे आहेत. जिथे सभा आहे तिथे ते येतात कधी आणि जातात कधी याविषयी प्रचंड गुप्तता बाळगली जाते. मोजक्याच महत्वाच्या व्यक्तींना विमानतळावर प्रवेश असतो. बाकी सगळे बंद!
या पार्श्वभूमीवर पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अगदी यांचे १९६० ते १९८० च्या काळातील दौरे कसे होते ते सांगणारे हे छायाचित्र! ते आहे पुण्याच्या विमानतळावरचे. १९७२ सालातले. प्रचारसभेसाठी म्हणून इंदिरा गांधी पुण्यात आल्या होत्या. विमानळावर त्यांचे स्वागत करत आहेत, काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष बबनराव पडवळ ( जे पूढे ८१ मध्ये महापौर झाले.) एक किशोरवयीन मुलगा आहे तो सुनील. शहराध्यक्षांचा मुलगा. नंतर काँग्रेसचे तत्कालीन नेते अनंतराव थोपटे, नगरसेवक बबनराव किराड. त्याशिवाय आणखी एकदोन लहानमुलेही दिसत आहे. सर्वांच्या अभिवादनाचा नम्रतेने स्विकार करणाऱ्या, नेहमीच्या काळ्या रंगाचा गॉगलमधील, पांढरी सुती साडी नेसलेल्या इंदिरा गांधी. नेते आपल्या लहान मुलांनाही घेऊन विमानतळावर येतील इतकी मोकळीक त्यावेळी होती. नेतेही या मुलांबरोबर बोलत, त्यांची विचारपूस करत. कसलीही सुरक्षा व्यवस्था त्याआड येत नसे.