वाल्हे : पुराणप्रसिद्ध बोलले वाल्मीक ! नाम तिन्ही लोक उद्धरती! महर्षी वाल्मीकीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फुलांची उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दौंडज येथील विसाव्यानंतर सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. दुपारी दीडच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे नगरीमध्ये पोहोचला यावेळी वरुणराजाने हजेरी लावली व जणू काही पावसाने स्वागत केले.
वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींचा नगारा, घोडे व माउलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वरूप दर्शन दिले होते. तसेच पालखी सोहळ्यात माउलींचे विश्वरूप दर्शन समाज आरतीच्या वेळेस पाहावयास मिळाले. पालखी सोहळा उद्या सकाळी सहा वाजता निरेच्या दिशेने जाणार असून निरा नदी स्नान करून सातार जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.
दुपारीच झाली समाजआरती
त्यानंतर पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या सुकलवाडी रेल्वे गेटच्या मुक्कामी पालखीतळावर दुपारी अडीच वाजता पोहोचला. प्रत्येक ठिकाणी पालखी सोहळाच्या मुक्कामच्या दररोज सायंकाळी समाज आरती घेतली जाते. मात्र वाल्हे येथे पालखी दुपारीच पोचते त्यामुळे पोचताच दुपारी समाज आरती झाली. सोहळ्यात समाज आरतीला विशेष महत्त्व आहे. सोहळ्यातील पुढील सत्तावीस व मागील वीस दिंड्या समाज आरतीसाठी तळावर आल्या. समाज आरतीला हजारोंच्या संख्येने भाविक जमले होते. यावेळी दिंडी समाजाच्या अडचणी विचारात घेऊन गेल्या. समाज आरतीच्या वेळी मध्यभागी माऊलींची पालखी ठेवली गेली व त्याभोवताली गोलाकार हजारो भाविक बसले, तर ४७ दिंड्या उभ्या केल्या गेल्या. पालखीसमोर चोपदार मालक, त्यापुढे वासकर, आळंदीकर, शितोळे सरकारांचे प्रतिनिधी उभे होते.