पिंपरी : राज्य सरकार आॅनलाइन पद्धतीने ६० हजार आॅटो रिक्षा परवाने वाटप करणार आहे. त्यात महिलांना ५ टक्के आरक्षण देण्यात आहे. या आरक्षणामुळे बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निर्णयाचे पिंपरी-चिंचवड मनसे वाहतूक सेनेने स्वागत केले आहे.गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण व नोकरी मिळत नाही. अशा महिलांना रिक्षाचा परवाना मिळाल्यास त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तळागाळातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. रिक्षा परवाना मिळण्यासाठी एक वर्षाच्या अनुभवाची अट महिलांसाठी शिथिल करण्याचा निर्णयही योग्य आहे, असे मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.दारू व अमली पदार्थ सेवन करणाऱ्या वाहनचालकाचा परवाना रद्द करण्याबरोबरच न्यायालयाकडे पहिल्या गुन्ह्यासाठी आरोपीच्या कैदेची मागणी करणारा निर्णय योग्य ठरणार आहे. त्यामुळे वाहनचालक, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे, असेही मोढवे यांनी पत्रकात म्हटले आहे. (वा. प्र.)
रिक्षा परवान्यात महिला आरक्षणाचे स्वागत
By admin | Published: January 07, 2016 1:13 AM