पुणे : पुणे आणि भाजपचे नाते वेगळे असून, त्यांचा संबंध म्हणजे विचार, संस्कार व आस्था असा आहे. पुण्यात पुढील पाच वर्षे विकासाची नवीन उड्डाणे करायची आहेत. त्यासाठी पुण्यात गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज आहे. आयटी हब आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला येत्या काळात ‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना दिली. महायुतीचे नवीन सरकार आल्यावर पुण्याच्या विकासासाठी गतीने काम करेल, असेही माेदी म्हणाले.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीरंग बारणे, खासदार मेधा कुलकर्णी, रूपाली चाकणकर, डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी राजेश पांडे, धीरज घाटे, दीपक मानकर, नाना भानगिरे, संजय सोनवणे, गणेश बीडकर यांच्यासह ३१ मतदारसंघांतील उमेदवार उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भाजपला पुणेकरांनी नेहमीच प्रेम दिले. मी भरोसा देतो की, पुणेकरांचा विश्वास आम्ही तुटू देणार नाही. राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही देशाच्या विकासाला गती देत आहोत. देशात रेकॉर्ड ब्रेक परकीय गुंतवणूक झाली आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे व त्याचा फायदा पुणे शहरालाही होत आहे. पुण्याची ऑटोमोबाइल क्षेत्रात वेगळी ओळख आहे. देशाला त्याचा धाक आहे. इलेक्ट्रॉनिक व आयटी क्षेत्रात दररोज नवी गुंतणूक होत असते, तेही पुण्यासाठी फायदेशीर आहे. स्टार्टअप योजनेचे तर पुणे मोठे हबच झाले आहे.”
पुण्याकडे आमचे नेहमीच लक्ष आहे, असे स्पष्ट करून मोदी यांनी मेट्रो प्रवासी सेवेचा उल्लेख केला. पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होईल. रिंगरोड, मीसिंग लिंक प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पालखी मार्ग देखील वेगाने निर्माण होत असून, ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही समर्पित सेवा आहे. नागरिकांची स्वप्ने आणि आवश्यकता या माझ्या ऊर्जा आणि योजना कामाचा आधार आहे, असेही मोदी म्हणाले.
मराठीला अभिजात दर्जा मिळाला, याचा पुणेकरांना झाला तेवढा आनंद कोणालाच झाला नसेल. काँग्रेसने फक्त आश्वासने दिली. आम्ही मात्र आमचे दायित्व पूर्ण केले. तुळापूर संभाजी स्मारक उभे करण्यासाठी निधी मंजूर केला. आंबेगाव शिवसृष्टीचे काम होत आहे, त्यासाठी निधी दिला आहे. लहुजी वस्ताद संग्रहालय व स्मारकही तयार करण्यात येईल. त्यासाठीही निधी मंजूर केला आहे. ही कामे येत्या ५ वर्षांत होतील. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान