पुणे : सहा वर्षाच्या मुलीच्या खुनाच्या आरोपातून उच्चशिक्षित आईची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी निर्दोष मुक्तता केली. या खटल्याची पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाचे वतीने या खटल्यात ७ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. आईच्या बाजूने अँड मिलिंद दत्तात्रय पवार यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले की लहान मुलगी खेळकर होती, किचन ओट्यावर चढून उड्या मारत होती, खेळता- खेळता किचन मधील लोखंडी रॅकवर उंचावरून खाली पडली. त्या रॅकला सुरी, कटर तत्सम धारदार वस्तू होत्या. रॅक वर उंचावरून पडल्याने छोट्या मुलीला जखमा झाल्या व त्यात तिचा मृत्यू झाला आहे. या दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे. फक्त त्रास देण्यासाठी व आईला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्या साठी स्वत:च्या छोट्या मुलीच्या खुनाचा खोटा आरोप केला असल्याचे पवार यांनी सांगितले. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी निर्दोष आईची निर्दोष मुक्तता केली. अँड. अक्षद वायकर यांनी या खटल्यात मदत केली. काय आहे प्रकरण?
उच्चशिक्षित असलेली आरोपी महिला लग्नापूर्वी पुण्यात हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीत नोकरीला होती. लग्न झाल्यानंतर ती नव-यासमवेत अमेरिकेला वास्तव्यास गेली. तिथे या दांपत्याला २०१३ मध्ये मुलगी झाली. व्हिजाची मुदत संपल्याने हे दांपत्य मुलीसह भारतात परतले. मुलगी मार्केटयार्ड येथील एका कॉंव्हेंट शाळेत पहिलीत शिकत होती. मुलगी जन्माने अमेरिकन असल्याने वडिलांना पुन्हा अमेरिकेत परत जायचे होते. त्यासाठी कंपनीतर्फे ते प्रयत्न करीत होते. पण आईला अमेरिकेत जायची इच्छा नव्हती. वडिलांना कंपनी तर्फे पुन्हा अमेरिकेत जायचं निश्चित झाल्यावर दि. ९ सप्टेंबर २०१९ रोजी ते तिघेही व्हिजा स्टँपिंगसाठी चेन्नई येथे जाणार होते. दुपारी २ वाजता पुणे विमानतळावरून विमानाचे उड्डाण होते. आम्ही दोघी येणार नाही तुम्ही एकटेच जावा असे ती नव-याला म्हणत होती. परंतु छोट्या मुलीला अमेरिकेत जाण्याची इच्छा होती. लहान मुलीसह सर्वांनीच अमेरिकेत वास्तव्यास जाण्याचा आग्रह केल्याने आईचा राग अनावर झाला. तिने बाथरूम मध्ये जाण्याचा बहाणा करून छोट्या मुलीला सहकारनगर येथील तिच्या काकांच्या घरात नेले. किचन मध्ये जाऊन आतून दरवाजा बंद केला. किचन मध्ये छोट्या मुलीच्या दोन्ही हाताच्या नसा सुरीने कापल्या व तिचा खून केला असा आरोप आईवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्या महिलेच्या चुलत भावाने पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तिच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.