भोर : भाटघर धरण खोऱ्यातील लव्हेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले असून आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीसाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या आरोग्य केंद्रामुळे दुर्गम डोंगरी भागातील २८ गावांतील १८ हजार नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या तृप्ती खुटवड यांनी सांगितले.भाटघर धरण भागातील दुर्गम डोंगरी भागात आरोग्य सुविधा कमी प्रमाणात पोहोचत होती. त्यामुळे या भागाच्या जिल्हा परिषद सदस्या तृप्ती खुटवड यांनी जोगवडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. मात्र या आरोग्य केंद्रासाठी २० गुंठे जागा उपलब्ध होत नसल्याने हे आरोग्य केंद्र लव्हेरी येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. लव्हेरी ग्रामपंचायतीने २० गुंठे जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर माजी उपसभापती विक्रम खुटवड यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून लव्हेरी येथे आरोग्य केंद्र हस्तांतर करून घेतले आणि जिल्हा परिषदेमधून आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या आरोग्य केंद्रामुळे भाटघर भागातील जोगवडी, माजगाव, लव्हेरी, गोरड, म्हशीवली, तळेम्हशीवली, वाकांबे, वाढाणे, करंदी खुर्द, करंदी बुद्रुक, कांबरे खुर्द, कांबरे बुद्रुक, कुरुंजी, मळे, डेरे, भुतोंडे, भांडवली, खुलशी, गृहिणी, चांदावणे, बोपे, कुंबळे, हर्णस, ब्राम्हणघर, नऱ्हे, संगमनेर, माळवाडी, आळंदे, आळंदेवाडी, इंगवली, सांगवी हि. मा., येवली या २८ गावांतील १८ हजार लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. (वार्ताहर)
लव्हेरीला होणार सुसज्ज आरोग्य केंद्र
By admin | Published: December 22, 2016 1:45 AM