जेजुरी : नायगाव (ता. पुरंदर) येथे वर्षापासून सुरूअसलेल्या वाळूउपशामुळे ओढ्याकाठच्या विहिरी तळात गेल्या आहेत. बेकायदा वाळूउपशामुळे ओढा विद्रूप तर झाला आहेच; मात्र त्याबरोबर गावातील डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. शेत शिवाराचे आणि एकूणच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वेळा याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही याकडे काणाडोळा केला जात असून, स्थानिक प्रशासन तात्पुरती कार्यवाही करत आहे. मात्र वाळूउपसा एका वर्षापासून सुरू आहे. मागील वर्षी ओढा रुंदी व खोलीकरणाच्या नावाखाली हा वाळू उपसा सुरू केला. ओढ्याची खोली अगर रुंदी वाढ झाली नाहीच. मात्र ओढ्याचे विद्रूपीकरण झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे केल्याने ओढ्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. लगतच्या शेतजमिनी वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील माळवदकर मळा येथील या विहिरीची पाणीपातळी अगदी तळात गेली असून, कितीही दुष्काळ पडला तरीही या विहिरीची पाणीपातळी कधीही कमी झाली नव्हती. उलट आसपासच्या गावातील लोकही पाणी घेऊन जात असत, अशी माहिती जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीटओढ्याकाठच्या परिसरातील अनेक विहिरी त्याचप्रमाणे गावच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळीही कमालीची घटली आहे. मात्र, या विहीर परिसरात झालेल्या प्रचंड वाळूउपशामुळे यंदा एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अर्थपूर्ण सहकार्याचा ग्रामस्थांचा आरोप४नायगावच्या ओढ्यातून सध्या दररोज दोन ते चार ट्रक वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. महसूल प्रशासनाकडे तक्रारी देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वाळूउपशामुळे विहिरी तळात
By admin | Published: May 11, 2015 6:20 AM