पुणे : गुरुवारी सायंकाळची साडेसहाची वेळ... वाहनांच्या गर्दीमुळे झालेली वाहतूककोंडी... याच वाहनांच्या गर्दीतून शाळेतील ५० विद्यार्थिनींनी भरलेली स्कूल बस धिम्या गतीने वडगाव धायरीच्या दिशेने पुढे सरकते. परंतु, या पीएमपी बसच्या चालकाच्या छातीत दुखू लागते. चालक कशीबशी बस रस्त्याच्या बाजूला घेतो अन् अचानक बसमध्येच कोसळतो. त्यातच त्याचा जीव जातो... ही घटना गुरुवारी रेणुका स्वरूप शाळेच्या विद्यार्थिनींनी पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.पीएमपीच्या बसने विद्यार्थी वाहतूक करणारे विनोद एकनाथ कोंडे (वय ३३, रा. कात्रज) हे नेहमीप्रमाणे रेणुका स्वरूप शाळेतील विद्यार्थिनींना वडगाव धायरी येथे सोडविण्यास निघाले. कोंडे हे पीएमपीचे कायम स्वरूपी सेवा देणारे चालक आहेत. सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्यानंतर त्यांची बस निघाली. वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढत बस सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिराच्या चौकापर्यंत पोहोचली. परंतु, विनोद कोंडे यांच्या छातील दुखू लागल्याने त्यांनी गर्दीतून बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. हृदयविकाराच्या झटका आल्याने ते बसमध्येच कोसळले. बसच्या वाहकाने त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा जीव गेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोंडे यांनी प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यामुळे बसमधील ५० विद्यार्थिनींचे प्राण वाचले. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. (प्रतिनिधी)
जीव गेला; पण वाचवले प्राण
By admin | Published: September 30, 2016 4:56 AM