पुणे : रिव्हर्स गियर टाकल्याने टेम्पोसह विहिरीत पडलेल्या चालकाला अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरुप सुटका केली. ही घटना कात्रज -कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील पुरंदर वॉशिंग सेंटरजवळ बुधवारी सकाळी पावणेदहा वाजता घडली.
याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पवार (वय ३५) हे पिकअप टेम्पो वॉशिंग सेंटर येथे आले होते. टेम्पोत बसून त्यांनी टेम्पोचा रिव्हर्स गिअर टाकला. त्यामुळे अचानक टेम्पो मागे जाऊन टेम्पोसह पवार विहिरीत पडले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. तेथे ४० फुट खोल असलेल्या विहिरीत पवार पडले होते. कडेला असलेल्या एका दोराला धरुन ते उभे होते. जवानांनी तत्परतेने मोठी रश्शी, रिंग पाण्यात टाकून जवान किरण पाटील यांना खाली विहिरीत उतरवले. जवान पाटील यांनी विहिरीत अडकलेल्या व्यक्तिशी संवाद साधत त्याला धीर देत त्याच्या कमरेला दोर बांधला व रिंगचा वापर करत सदर व्यक्तीस इतर जवानांनी सुखरुप बाहेर घेत सुखरुप सुटका केली. जवानांनी सुमारे तीस मिनिटात ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली.
या कामगिरीत कात्रज अग्निशमन केंद्र अधिकारी संजय रामटेके, वाहनचालक बंडू गोगावले, तांडेल वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, धीरज जगताप यांनी सहभाग घेतला.