पुणे : विमानाचा दरवाजा बंद आहे की नाही, हे तपासण्यासाठी गेलेल्या कामगाराचा (एरोब्रीज) शिडीवरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एअर एशिया कंपनीच्या सहायक सुरक्षा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
विवियन ए (विवियन ॲन्थेनी डोनमिक) (वय ३३, रा. आनंदी राज व्हिला, आर्दशनगर, लोहगाव) असे मृत सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. एस अजय हरिप्रसाद (रा. शिव कॉलनी, लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या एअर एशिया कंपनीच्या सहायक सुरक्षा व्यवस्थापकाचे नाव आहे.
याबाबत विवियन यांच्या पत्नी अविला फ्रान्सकेन विवियन (वय २९, रा. तामिळनाडू) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना लोहगाव विमानतळावर १३ एप्रिल रोजी सकाळी घडली होती.
अधिक माहितीनुसार, विवियन ए हे सुरक्षा अधिकारी म्हणून एअर एशिया विमान कंपनीत काम करत होते. विमानातून प्रवासी उतरले अथवा बसल्यानंतर विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी विमानाचे दार बंद आहे की नाही, हे पाहण्याचे काम विवियन यांच्याकडे होते. त्याप्रमाणे विमानतळावर आलेल्या विमानाचे दार बंद आहे का नाही हे पाहण्यासाठी ते एरोब्रीजवर गेले होते. तेव्हा शिडीवरून खाली पडून मृत्यू झाला.
सहायक सुरक्षा व्यवस्थापक एस अजय हरिप्रसाद यांनी कामगाराच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, गम बुट, सुरक्षा जॅकेट या साधनाचा पुरवठा करून त्यांना कामावर पाठविणे आवश्यक होते. मात्र, अपघात घडला तेव्हा विवियन याने कोणतेही सुरक्षा साधन न वापरल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक वाकडे तपास करीत आहेत.