पुणे : कात्रज परिसरात फाॅरेन सिटी एक्झिबेशनमध्ये वडिलांसोबत गेलेल्या आठ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गणेश राजू पवार (वय- ८, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील राजू पांडू पवार (वय ३७) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडिलांनी सांगितले की गणेश आचार्य गुरुकुल शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता. त्याची सहल उद्या जाणार होती. तत्पूर्वी ते त्याला कात्रज-कोंढव्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत फाॅरेन सिटी एक्झिबेशनमध्ये घेऊन गेले होते. या मेळ्यात लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळणी होत्या. गणेश विद्युत पाळण्यात बसण्यासाठी जात असताना तेथे असलेल्या जाळीत वीज प्रवाह उतरला होता. गणेशचा जाळीला स्पर्श झाला आणि विजेच्या झटक्याने तो खाली कोसळला. त्याच्या वडिलांना देखील शॉक लागला होता. तेथील एका व्यक्तीने काठीने ढकलले त्यामुळे वडील बचावले. हा प्रकार बघता ऑपरेटरने लगेच लाईट बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर घबराट उडाली. विद्युत पाळण्याचा वीज प्रवाह त्वरीत खंडीत करण्यात आला. बेशुुद्धावस्थेतील गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संयोजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.