पुणे : शेजारी राहणाऱ्या महिलेने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका व्यावसायिक तरुणाकडून ८ लाख ३९ हजार रुपये खंडणी उकळली. यानंतर पुन्हा दहा लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी मूळ सातारा येथील ३७ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला, तिचा पती आणि दाजी यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित महिलेनेदेखील फिर्यादीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी गणेश चंद्रकांत माने हा मूळचा सातारा येथील रहिवासी आहे. तो इस्टेट एजंट आहे. त्याचे मुंबईला नेहमी येणे- जाणे असते. सोयीसाठी त्याने दत्तवाडी येथे फ्लॅट घेतला आहे. त्याच्या घरासमोरच राहणारी महिला स्वत:हून ओळख वाढवत चहा आणि नाष्ट्याच्या बहाण्याने मानेला घरी बोलावून घेत होती. यानंतर जवळीक वाढवून त्यांच्यामध्ये शरीरसंबंध निर्माण झाले. दरम्यान, तिने याची छायाचित्रेही मानेला काढायला लावली. यानंतर ती वारंवार पैशाची मागणी करू लागली. पैसे न दिल्यास घरच्यांना सांगण्याची धमकी दिली जात होती. दरम्यान, तिच्या दाजीने प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली मानेच्या मोबाइलमधील फोटो स्वत:च्या मोबाइलमध्ये काढून घेतले. त्यानंतर तिचा पती आणि दाजी हेसुद्धा प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी करू लागले. महिलेला वर्षभरात तब्बल ८ लाख ३९ हजार रुपये देण्यात आले, यानंतरही १० लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून माने याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्हटकर करत आहेत.
महिलेनेही केली तक्रार; बलात्काराचा गुन्हा दाखल -
संबंधित महिलेनेदेखील दिलेल्या तक्रारीनुसार गणेश माने याच्यावर बलात्काराचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मानेसोबतच दाजी त्रिपाठीलाही फोटो नातेवाइकांना पाठल्याबद्दल आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.