पुणे : बुधवारी शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला हाेता. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने शेकडाे लाेक बेघर झाले. अंबिल ओढ्याच्या बाजूला असलेल्या टांगेवाली काॅलनी येथील सर्वच घरे पाण्याखाली गेली. बुधवारी रात्रीची परिस्थिती सांगताना येथील नागरिकांना हुंदका आवरता येत नव्हता. पाण्याची पातळी वाढत असताना आम्ही बाहेर पडत हाेताेच तर मानेपर्यंत पाणी वस्तीत शिरलं अन् त्यात दाेन लाेक वाहून गेले येथील रहिवासी संजय शिंदे सांगत हाेते.
बुधवारी रात्री 8 च्या सुमारास शहरातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाला सुरवात झाली. ढगफुटी झाली की काय असे वाटावे असा पाऊस काेसळत हाेता. तासाभरातच रस्त्यांना ओढ्यांचे स्वरुप आले हाेते. अनेक वाहनचालकांची वाहने पाण्यात बंद पडली. सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरवात झाली. पुण्यातील अरणेश्वर भागात अंबील ओढ्याच्या बाजूला टांगेवाली काॅलनी वसाहत आहे. कात्रज भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढा दुथडीभरुन वाहत हाेता. त्यातच सहकारनगर, तसेच पर्वतीकडून येणारे पाणी सुद्धा या वस्तीत शिरले. माेठमाेठाले पाण्याचे लाेंढे वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला हाेता. काही वेळात पाण्याची पातळी वाढल्याने नागरिक घरातील माैल्यावान वस्तू घेऊन बाहेर पडले. या वस्तीतील तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांना तातडीने वस्तीच्या बाहेर काढले. पाण्याची पातळी वाढल्याने घरांचे पत्रे उचकटून अनेकांना तरुणांनी बाहेर काढले. यातच पाण्याचा माेठा लाेंढा आल्याने तीन नागरिक पाण्यात वाहून गेले. राेहीत आमले हा दहावीत शिकत असलेल्या मुलाने अनेक नागरिकांना बाहेर काढले. पुन्हा काेणी राहिले आहे का हे पाहण्यासाठी ताे आत गेला. एक महिला आणि एका लहान मुलासाेबत ताे बाहेर पडत असताना तेथील एका इमारतीची संरक्षक भिंत त्यांच्यावर काेसळली अन तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या पाण्यात येथील रहिवासी संजय शिंदे हे देखील अडकले हाेते. रात्रीची परिस्थिती सांगताना त्यांना त्यांचा कंठ दाटून आला. शिंदे म्हणाले, पावसाळ्यात आमच्या वस्तीमध्ये दरवर्षी काही प्रमाणात पाणी येत असते. काल मात्र अचानक पाणी आल्याने वस्तीत माेठ्याप्रमाणावर पाणी भरण्यास सुरुवात झाली. घरांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांनी घरे खाली करण्यास सुरुवात केली. हातात मिळेल ते साहित्य घेऊन लाेक बाहेर पडले. काही लाेक बाहेर पडत असताना पाण्याची पातळी आणखीनच वाढली. मानेपर्यंत पाणी आले. पाण्याचा वेग सुद्धा अधिक असल्याने यात दाेन लाेक वाहून गेले. तरुणांनी पत्र्यावर चढून ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, सर्व घरे ढासाळयला लागली.