पुणे/किरण शिंदे : इंस्टग्राम रिल्सवर तरुणाई प्रचंड सक्रिय असल्याचे सध्या दिसू लागले आहे. तरुण मुले सध्यस्थितीत विनोदी विषयांबरोबरच सामाजिक आणि राजकीय विषयांवर रिल्स करू लागले आहेत. प्रत्येक तरुण तरुणींमध्ये असलेला क्रिएटीव्हीटीचा अथांग सागर सोशल मीडियातून बाहेर पडत आहे. अशातच पुण्यात दोन तरुणांनी दुचाकीवरून जातानाचे रिल्स तयार केले आहे. पुणेपोलिसांना पुणेरी भाषेत टोमणे देणारे हे इन्स्टा रिल्स जोरदार व्हायरल होत आहे. ''आमच्याकडे लायसन्स आहे, त्यामुळे आम्हाला थांबवून वेळ वाया घालवू नका" असे लिहिलेले फलक हाती घेऊन पुणेरी तरुणाईने इन्स्टा रील्स करून वाहतूक पोलिसांना पुणेरी भाषेत टोमणे मारले आहेत.
सध्या वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून सध्या चौकाचौकात दुचाकीस्वारांना थांबवून जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या पुणेकर तरुणाईने मुठा नदीपात्रात इन्टाग्रामच्या माध्यमातून एक रील्स तयार केले आहे. त्यात त्यांनी दुचाकीवरून जात असताना वारंवार गाडी बाजूला घेण्यास सांगणार्या वाहतूक पोलिसांना टोमणे मारले आहेत. यात दोन तरुण दुचाकीवरून जाताना आणि नदीपात्रातील घाटावर एक फलक हाती घेतलेले दिसत आहेत. त्या फलकावर 'लायसन्स आहे, थांबवून आमचा आणि तुमचा वेळ घालवू नये,' असे लिहिलेले आहे. या व्हिडीओला 'आम्ही पुणेरी…' हे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.