शहरात कचरा समस्या गंभीर झाल्याने आता महापालिकेकडून यावर ठोस पाऊले उचलली जात आहेत. शक्यतो ओला कचरा स्वत:च्या जागेतच जिरवण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोठ्या सोसायट्यांना मिळकतकरात ५ टक्के सवलत देखील दिली जाते. त्यासाठी सोसायटीमध्ये कंपोस्ट खताचा प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॅा. कुणाल खेमनार यांनी सोसायटीत कचरा न जिरवल्यास पहिल्यांदा ५ हजार रूपये दंड होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळी दहा हजार रूपये आणि तिसऱ्या वेळी १५ हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
कसा कराल कंपोस्ट खत ?
याबाबत भारती विद्यापीठात पर्यावरण विभागात काम करणाऱ्या प्रा. अनुष्का कजबजे यांनी घरात किंवा सोसायटीत ओला कचरा कसा जिरवावा, त्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या,‘‘एक मोठी कुंडी घ्यायची आणि त्याला खालून छोटंसं छिद्र पाडायचे. त्यामध्ये मग नारळाचा वाळेला काथ्या कुंडीत पसरावा. त्यानंतर गार्डनमधील वाळलेल्या पानांचा कचरा टाकावा आणि त्यानंतर घरातील ओला कचरा समाविष्ट करावा. ओल्या कचऱ्यात अगोदर शेण किंवा आंबट ताक किंवा जीवामृत टाकावे. त्यानंतर कुंडीत बगीच्यामधील वाळलेल्या पानांचा कचरा आणि वर नारळाचा काथ्या टाकावा. या कुंडीत थोडंसं पाणी टाकावे. जेणेकरून ते त्यामध्ये मुरेल. ही कुंडी आठवडाभरा ठेवल्यानंतर खालचा भाग वरती घ्यावा आणि वरचा खाली टाकावा. या सात दिवसांत त्या कचऱ्याचे उत्तम कंपोस्ट तयार व्हायला सुरवात होते. तो आपल्या बागेतील झाडांना देऊ शकता.