पिंपरी : भाटनगर, रमाबाईनगर, बौद्धनगर या झोपडपट्ट्यांतील वीज चोरांवर विद्युत महावितरणकडून कारवाई केली. विद्युत खांबांवर तारेचे आकडे टाकून झोपड्यांमध्ये वीज घेणारे वीज चोर विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. पोलीस फौजफाटा घेऊन सुमारे ४०० लोकांवर त्यांनी कारवाई केली. तेथून थोड्याच अंतरावर पिंपरी बाजारपेठेत डीपी बॉक्समध्ये वायर टाकून राजरोसपणे दुकानांसाठी वीज वापर करणारे व्यापारी, व्यावसायिक मात्र या अधिकाऱ्यांच्या हाती लागले नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वीज बिल वेळेत भरले जात नाही, एका मीटरवरून अनेक घरांना, झोपड्यांना विद्युत पुरवठा केला जातो, ही कारणे पुढे करून भाटनगर, रमाबाईनगर, बौद्धनगर येथील रहिवाशांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. नव्याने मीटरची मागणी केली, तर पूर्वीचे थकीत बिल भरल्याशिवाय विद्युत मीटर देता येणार नाही, असे सांगून अधिकारी या भागातील नागरिकांना वीज मीटर देण्याबाबत उदासीनता दाखवितात. अंधारात राहणे शक्य नाही. मागणी करूनही वीज मीटर मिळत नाही. त्यामुळे जोखीम पत्करून या भागातील रहिवासी थेट विद्युत खांबांवर तारा टाकून वीज घेतात. त्यांची ही चोरी वेळोवेळी पकडली जाते. मंगळवारी झालेल्या कारवाईतसुद्धा त्यांची वीज चोरी पकडली गेली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. डीपी बॉक्सची झाकणे तोडून त्यात वायर टाकून दुकानासाठी, तसेच राहत असलेल्या घरासाठी चोरून वीज वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या कमी नाही. भाटनगर येथून थोड्याच अंतरावर बाजारपेठेत आले, तर दुकानांमध्ये दिसणारा विद्युत दिव्यांचा झगमगाट हा दुकानदारांनी रितसर घेतलेल्या वीज जोडणीतला नसून डीपी बॉक्समधून चोरून घेतलेल्या वीज जोडणीचा असल्याचे दिसून येते. अनेक दुकानांतील प्रकाश व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा चोरीच्या विजेवर असल्याचे दिसून येते. काही दुकानदार सर्रासपणे चोरीची वीज वापरतात. स्वत:च्या मीटरमधील वीज वापरणारे काही प्रामाणिक दुकानदार, व्यावसायिकही आहेत. असे काही दुकानदार अपवाद वगळता राजरोसपणे वीज चोरी करणारे दुकानदार मात्र कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती का लागत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वीज चोरांवर कारवाई झालीच पाहिजे, परंतु कारवाईत भेदभाव कशासाठी? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.मीटर बसवून देण्याची मागणी रितसर मीटर मिळाल्यास वीज चोरी करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. ज्यांनी वीज मीटरची मागणी केली आहे, त्या रहिवाशांना सवलतीच्या दरात मीटर बसवून द्यावेत, असे निवेदन भारतीय महिला कामगार संघटनेच्या शहराध्यक्षा नीता परदेशी यांनी विद्युत महावितरणच्या पिंपरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. गरजू १०० लोकांना वीज मीटर मिळावेत, यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केली. गरजूंना मीटर बसवून द्यावेत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
डीपीमधील भेंडोळ्यांचे काय?
By admin | Published: May 08, 2015 5:27 AM