Pune Rain Update ( Marathi News ) : पुणे शहरात काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण शहर जलमय झालं आहे. शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरश: नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. तसंच आज बारावीची पुनर्परीक्षाही होती. पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्याने अनेक विद्यार्थी या परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांबाबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की, "महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकणार नाहीत, ही अडचण आपण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सांगितली असता जे परीक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत, अशा परीक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यासह राज्यभरासाठी असणार आहे," अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
दरम्यान, "या संदर्भातील लेखी निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल. जे परीक्षार्थी पोहोचू शकले नाहीत, त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, ही विनंती. तातडीनं निर्णय घेतल्याबद्दल दीपक केसरकर यांना धन्यवाद," असंही मोहोळ यांनी म्हटलं आहे.
पुणे महापालिका अग्निशमन दलाकडून पुणेकर सुरक्षित स्थळी
पूर परिस्थितीत पुणे महापालिकेचे अग्निशमन दल शहराच्या नदीकाठच्या विविध भागात अडकलेल्या पुणेकरांनी सुरक्षित स्थळी पोहोचवत आहे.
- रजपूत विट भट्टी, खिलारेवाडी : ३१ नागरिक - तपोधाम, वारजे : ४८ नागरिक (ज्यामध्ये एक पॅरलिसिस झालेला मुलगा व एका गर्भवती महिलेचा समावेश) - पुलाचीवाडी, डेक्कन : १५ नागरिक- पाटील इस्टेट : १० नागरिक- सिंहगड रस्ता : ५० नागरिक
दरम्यान, अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह २० अग्निशमन अधिकारी आणि जवळपास ३०० जवान विविध ठिकाणी कार्यरत आहेत.