पुणे : मोद म्हणजे संस्कृतमध्ये आनंद. गणपतीला जे खाल्ल्यावर आनंद होतो ते म्हणजे मोदक. हा खास अस्सल भारतीय असाच प्रकार आहे. उकडीचे मोदक घाटाखालचे, म्हणजे कोकणातले. कारण तिथे तांदूळ, नारळ भरपूर. ते बहुधा पेशव्यांबरोबर घाटावर म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात आले असावेत. इथे ते तळणातले झाले. कारण इथे तेल, तूप भरपूर.
सर्वप्रथम उकडीचे. तांदळांचे पीठ, त्यात थोडेसे मीठ व ते तूपाबरोबर मळून त्याचा करायचा गोळा. तो उकडून घ्यायचा. थोडी खसखस तव्यावर भाजून घ्यायची. त्यातच भरपूर सारे किसलेले ओले खोबरे ओल जाईल; पण ओलसरपणा नाही, असे परतून घ्यायचे. ते तसे असतानाच त्यात गूळ टाकायचा. हे सारे नीट परतून घेतले की मग झाले सारण तयार.
मळलेल्या पीठाची पुरी करायची. त्यात हे सारण भरायचे व मग मोदकाचा आकार द्यायला सुरुवात करायची किंवा आधीच मोदकाचा आकार देऊन नंतर त्यात मध्यभागी सारण भरायचे. मोदकाचा आकार हे लिहायला जेवढे सोपे, तितकेच करताना कठीण. त्याच्या नीट पाकल्या निघायला हव्यात. वर छानसे टोक यायला हवे. खालून वर मुगुटासारखा गोलाकार दिसला पाहिजे. पुन्हा हे सगळे उकडलेले पीठ गरम असतानाच करावे लागते. उकडीच्या मोदकाचा खरा कस तिथेच तर आहे.
तयार झालेले हे मोदक नंतर छान उकडून घ्यायचे. त्याआधी हवे तर त्याला केशरमिश्रीत दूध लावा, उकडलेले हे मोदक त्यावर तूप टाकून थेट तोंडात सोडायचे. त्याआधी नैवेद्य मात्र दाखवायला हवा. असे उकडीचे तयार मोदक आता बऱ्याच ठिकाणी मिळतात. कारण ते अनेक घरात आता जमत नाही म्हणून होतच नाहीत. आता ते तयार करण्याचे साचेही निघाले आहेत. त्यामुळेच काही कुटुंबेही उकडीचे मोदक तयार करून विक्रीही करतात. गरजू लोक ते घेतातही.
तळणीच्या मोदकांमध्ये पुरी कणकेची वापरतात. सारणात काहीजण सुके खोबरे वापरतात तर काही ओले. बांधणी तशीच. गोलामध्ये व्यवस्थित पाकळ्या पडायलाच हव्यात. कारण त्याशिवाय मोदकाची मजा नाही. गूळ अगोड असला की मोदक बिघडलेच समजा. त्यामुळे गूळ खोबरे पाहूनच घ्यायचे. उकडीच्या मोदकाचे आयुष्य एकाच दिवसाचे, तळणीचे मात्र दोनतीन दिवस सहज टिकतात. बसायच्या दिवशी उकडीचे व नंतरच्या दिवसात तळणीचे असे त्यामुळेच केले जात असावे.
कुठे : १) पुना गेस्ट हाऊस, गणपती चौक, २) नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ. त्याशिवाय अनेक कुटुंबेही करून देतात.
कधी- संकष्टी चतुर्थीला, आता गणेशोत्सवात पूर्ण १० दिवस.