काय बीकेसी, काय शिवतीर्थ; कुणी कशीही माणसं फोडतंय, लोकशाहीचा खेळखंडोबा लावलाय-अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:22 PM2022-10-09T15:22:49+5:302022-10-09T15:23:14+5:30
महाराष्ट्रातील राजकारणाचा राज्याच्या विकासावर होतोय परिणाम
सोमेश्वरनगर : दोघे एकमेकांना गद्दार बोलतात...त्याने प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख लोकांचे गेलेले रोजगार, देशातील महागाई यावर बोलायला कोणी तयार नाही. कोणी कोणाची माणसे फोडतंय. लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या ६१वा गळीत हंगाम व गव्हाण पूजन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, सध्याच्या सुरू असलेल्या राज्यातील गोंधळामुळे कुठलं सरकार किती दिवस टिकेल, हे अधिकाऱ्यांच समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू असून, याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे. सध्याच्या शिंदे सरकारवर टीका करताना ते म्हणाले, दसऱ्याच्या दिवशी तर काय बिकेसी मैदान..शिवतीर्थ मैदान.. त्यांनी पांढरा ड्रेस घातला आहे. ते उतरले. ते आता पायऱ्या चढत आहेत. काहीही पाहायला मिळत असल्याची खिल्ली उडवत हा गद्दार तो गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवालही केला.
साखर निर्यातीबाबत बोलताना पवार यांनी केंद्र सरकारने गेल्या वर्षी राबवलेले निर्यातीचे धोरण राबवावे तसेच सध्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७२ टक्के २६५ ऊस असून ८६०३२ उसाचे क्षेत्र वाढवले तर साखर उतारा जादा मिळून टनाला १५० रुपये जादा मिळतील, असे पवार म्हणाले.